‘बँक अधिकारीचं ’ बनून केली सायबर फसवणूक

सातारा येथे ज्येष्ठ नागरिकाची ८.५९ लाखांची ऑनलाइन फसवणूक
सायबर फसवणूक
सायबर फसवणूक
Published on

सातारा शहरातील शहापुरी परिसरात ऑनलाइन फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ८ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सायबर गुन्हेगारांच्या वाढत्या कारवायांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ज्येष्ठ नागरिकाला काही दिवसांपूर्वी मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे एक लिंक पाठवण्यात आली होती. त्या लिंकसोबत आलेल्या संदेशात स्वतःला बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून अधिक व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. विश्वास बसल्याने संबंधित व्यक्तीने ती लिंक उघडली आणि याच क्षणापासून सायबर गुन्हेगारांनी आपली खेळी सुरू केली.

लिंक उघडल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमधील संवेदनशील माहितीवर सायबर गुन्हेगारांनी ताबा मिळवला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून तसेच पत्नीच्या संयुक्त खात्यातून टप्प्याटप्प्याने ८.५९ लाख रुपये विविध व्यवहारांद्वारे दुसऱ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच ही फसवणूक लक्षात आली.

घटना लक्षात येताच संबंधित नागरिकांनी तातडीने शहापुरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात ही फसवणूक फिशिंग लिंक किंवा मोबाईल ॲक्सेसच्या माध्यमातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून संबंधित बँक व्यवहार, वापरलेली खाती आणि डिजिटल पुरावे यांचा सखोल तपास केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, बँकेची माहिती किंवा OTP शेअर करणे टाळावे, तसेच कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा संदेशाबाबत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता सायबर गुन्हेगार अधिक प्रगत पद्धती वापरत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याने कुटुंबीयांनीही त्यांना सतर्क ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Banco News
www.banco.news