सटाणा मर्चंट्स बँकेच्या १५ टक्के लाभांश वाटपास रिझर्व्ह बँकेची मंजुरी

सभासदांच्या विश्वासामुळेच बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम; चेअरमन दिलीप येवला व व्हा.चेअरमन चंद्रकांत सोनवणे यांचे प्रतिपादन.
दि सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक
सटाणा मर्चंट्स बँकेच्या १५% लाभांश वाटपास रिझर्व्ह बँकेची मंजुरी; चेअरमन श्री. दिलीप येवला, व्हाईस चेअरमन श्री. चंद्रकांत सोनवणे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देविदास बागडे .
Published on: 

सटाणा: उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य आणि विश्वासू आर्थिक संस्था म्हणून ओळख असलेल्या 'दि सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँके'ने आपल्या सभासदांना गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर मोठी गोड बातमी दिली आहे. बँकेच्या सभासदांना आर्थिक वर्षभराच्या कामगिरीपोटी १५ टक्के लाभांश वाटप करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अखेर मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेची ही परवानगी मिळताच आज, गणेश विसर्जनाच्या शुभमुहूर्तावर, सभासदांच्या बँक खात्यावर लाभांशाची रक्कम वर्ग करण्याच्या प्रक्रियेला प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे सभासदांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले आहे.

बँकेचे चेअरमन श्री.दिलीप येवला आणि व्हाईस चेअरमन श्री.चंद्रकांत सोनवणे यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली.

बँकेच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेऊन सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. यानंतर आयोजित बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) सर्व सभासदांनी या निर्णयावर एकमुखाने शिक्कामोर्तब केले.

सभासदांच्या मंजुरीनंतर बँक प्रशासनाने रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार आवश्यक असलेला सर्व कायदेशीर प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे सादर केला होता. या प्रस्तावाची सखोल पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने १५ टक्के लाभांश वाटपास हिरवा कंदील दाखवला. मंजुरीचे पत्र प्राप्त होताच बँकेने वेळ न गमावता गणेश विसर्जनाच्याच दिवशी सभासदांच्या खात्यात लाभांश जमा करण्यास सुरुवात केली आहे.

या यश प्रसंगी बोलताना चेअरमन दिलीप येवला व व्हा. चेअरमन चंद्रकांत सोनवणे म्हणाले, "बँकेच्या प्रत्येक टप्प्यावरील प्रगतीमध्ये सभासदांचा सहभाग, पाठिंबा आणि दृढ विश्वास अत्यंत मोलाचा राहिला आहे. सभासदांच्या याच विश्वासाच्या बळावर बँकेला सर्व आव्हानांवर मात करत आर्थिकदृष्ट्या सक्षम व भक्कम वाटचाल करता आली आहे. सभासदांनी बँकेवर दाखवलेल्या विश्वासाची परतफेड लाभांशाच्या माध्यमातून करण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो, आणि गणेश विसर्जनासारख्या पवित्र दिवशी हा लाभ सभासदांपर्यंत पोहोचवताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे."

सटाणा मर्चंट्स बँकेने सातत्याने जपलेली पारदर्शकता, ग्राहकसेवा आणि आर्थिक शिस्त यामुळे बँकेची पत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. १५ टक्के लाभांश मिळणे ही सध्याच्या कठीण आर्थिक आणि बँकिंग स्पर्धात्मक वातावरणात एक उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशीच खात्यावर थेट लाभांश जमा होत असल्याने सभासदांनी बँक व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.

या लाभांश वाटप प्रारंभ प्रसंगी बँकेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते. यात संचालक श्री. पंकज ततार, श्री. जयवंत येवला, श्री. कैलास येवला, श्री. स्वप्निल बागड, श्री. विठ्ठल येवलकर, श्री. सचिन कोठावदे, श्री. महेश देवरे, श्री. अभिजित सोनवणे, श्री. रमणलाल छाजेड, श्री. प्रवीण बागड, श्री. भास्कर अमृतकर, सौ. रुपाली कोठावदे, सौ. कल्पना येवला, श्री. प्रकाश सोनग्रा, श्री. जगदीश मुंडावरे, श्री. तुषार खैरनार (सी.ए.), श्री. दत्तात्रेय कापुरे, श्री. विजय भांगडिया, श्री. पियुष येवला तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देविदास बागडे आणि बँकेचा सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Banco News
www.banco.news