ग्रामीण भाग हादरला! जिल्हा बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी

सांगली जिल्हा बँक दरोडा : झरे शाखेत 22 लॉकर फोडले
सांगली जिल्हा बँक दरोडा
सांगली जिल्हा बँक दरोडा
Published on

आटपाडी (सांगली):
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे (ता. आटपाडी) येथील शाखेत अज्ञात दरोडेखोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी दरोडा टाकत स्ट्राँग रूममधील तब्बल 22 लॉकर फोडून कोट्यवधींचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या दरोड्यात प्राथमिक अंदाजानुसार 7 ते 10 किलो सोने, 20 ते 25 किलो चांदी व मोठी रोकड चोरीला गेली आहे.

झरे बसस्थानक परिसरातील तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीत ही बँक भाडेतत्त्वावर सुरू आहे. दरोडेखोरांनी बँकेच्या पूर्वेकडील लोखंडी खिडकी कटरच्या साहाय्याने कापून आत प्रवेश केला. त्यानंतर अत्यंत सराईतपणे स्ट्राँग रूममधील नामांकित कंपनीचे लॉकर गॅस कटरच्या सहाय्याने तोडून ग्राहकांचे मौल्यवान दागिने व रोकड लंपास केली.

सीसीटीव्ही बंद, डीव्हीआर गायब

दरोडेखोरांनी चोरीपूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे, सायरन व इंटरनेटच्या वायर कापून संपूर्ण सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय केली. तसेच सर्व हालचालींची नोंद असलेला डीव्हीआर (DVR) सोबत नेऊन पुरावे नष्ट केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी गॅस कटर, सिलिंडर व पाईप आढळून आले आहेत. हाताचे ठसे राहू नयेत म्हणून दरोडेखोरांनी हातमोज्यांचा वापर केल्याचेही दिसून आले.

सकाळी उघडकीस आली घटना

गुरुवारी सकाळी सुमारे दहा वाजता बँक कर्मचारी कामावर आल्यानंतर दरोडा पडल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच लॉकरधारकांनी बँकेसमोर मोठी गर्दी केली. आयुष्यभराची पुंजी चोरीला गेल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस तपास सुरू

घटनेनंतर आटपाडी पोलिस, ठसेतज्ज्ञ, गुन्हे अन्वेषण शाखा व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व हालचालींच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे.

फिर्याद नोंद

या प्रकरणी शाखाधिकारी व कॅशिअर हणमंत धोंडिबा गळवे (वय 46) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत 22 लॉकर फोडून सुमारे 9.30 लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचा उल्लेख असला, तरी प्रत्यक्ष ऐवजाची व्याप्ती अनेक पटीने मोठी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लॉकरधारकांकडून अंतिम यादी प्राप्त झाल्यानंतरच सोन्या-चांदीचा अचूक आकडा व किंमत स्पष्ट होणार आहे.

विशेष म्हणजे, याच शाखेत वर्षभरापूर्वी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता, तरीही सुरक्षा व्यवस्थेत पुरेशी सुधारणा झाली होती का, असा गंभीर सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.

Banco News
www.banco.news