समर्थ सहकारी बँकेवरील निर्बंधांच्या मुदतीत ३ महिन्यांची वाढ!

सार्वजनिक हितासाठी निर्णय; ७ जानेवारी २०२७ पर्यंत बँकेवर राहणार कडक नियम
Samarth Bank Solapur RBI restriction end date
६ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू असलेले निर्बंध आता पुढील वर्षापर्यंत वाढवले
Published on: 

सोलापूर : सोलापूर येथील समर्थ सहकारी बँक लि. (Samarth Sahakari Bank Ltd., Solapur) वर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) लादलेल्या निर्बंधांची मुदत आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, हे निर्बंध आता ७ जानेवारी २०२७ चे कामकाज बंद होईपर्यंत लागू राहणार आहेत.

सार्वजनिक हित आणि ठेवीदारांचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमन कायदा, १९४९ (Banking Regulation Act, 1949) मधील कलम ३५अ आणि कलम ५६ अंतर्ग मिळालेल्या अधिकारांचा वापर करत ६ ऑक्टोबर २०२५ रोजी समर्थ सहकारी बँकेवर पहिल्यांदा सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले होते.

त्यानंतर ३० जून २०२६ रोजी या निर्देशांना ७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाच, रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा ३ महिन्यांची मुदतवाढ देऊन ७ जानेवारी २०२७ पर्यंत बँकेवर निर्बंध कायम ठेवले आहेत.

प्रसिद्धीपत्रकात रिझर्व्ह बँकेने एका महत्त्वाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, "दिल्या गेलेल्या या मुदतवाढीचा किंवा सुधारणांचा असा अर्थ लावू नये की रिझर्व्ह बँक या बँकेच्या सध्याच्या आर्थिक स्थितीवर समाधानी आहे."

तसेच, पूर्वलक्षी प्रभावाने बँकेवर लादलेल्या इतर सर्व अटी आणि शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून त्या जशाच्या तशाच लागू राहतील.

ग्राहकांवर आणि कामकाजावर काय परिणाम?

  • रक्कम काढण्यावर मर्यादा: रिझर्व्ह बँकेच्या ३५अ कलमांतर्गतच्या या कारवाईमुळे बँकेच्या खातेदारांना खात्यातून पैसे काढण्यावर आणि नवीन कर्जे वितरीत करण्यावर कडक मर्यादा कायम राहतील.

  • नवे कर्ज वाटप बंद: बँकेला रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय नवीन कर्ज वाटप करणे, नवीन गुंतवणूक करणे किंवा कोणतीही मालमत्ता विकणे/हस्तांतरित करणे यावर बंदी असते.

  • परवाना रद्द झालेला नाही: रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईचा अर्थ बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाला असा होत नाही. परिस्थिती सुधारण्यासाठी बँकेला हा वेळ दिला जात असून, पुढील काळात परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.

बातमी स्रोत: भारतीय रिझर्व्ह बँक केंद्रीय कार्यालय, मुंबई (प्रेस रिलीज क्र. 2026-2027/1251 - बृज राज, मुख्य महाव्यवस्थापक).

Attachment
PDF
Directions under Section 35A read with Section 56 of the Banking Regulation
Preview
Banco News
www.banco.news