

नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी देवळा मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे राजेंद्र (नाना) सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी बिझनेस को-ऑप बँकेचे अशोक तापडिया आणि उपाध्यक्षपदी नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेचे सुनील गिते यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
ही निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक संदीप जाधव यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ३) गोविंद नगर येथील बँक असोसिएशनच्या कार्यालयात पार पडली.
अध्यक्षपदासाठी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या निवडीसाठी असोसिएशनचे संचालक हिरालाल सुराणा सूचक तर अजय ब्रह्मेचा यांनी अनुमोदन दिले. कार्याध्यक्ष पदासाठी असोसिएशनचे संचालक वसंतराव खैरनार सूचक आणि विश्वास ठाकूर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी दत्ताजी गायकवाड सूचक तर शरद दुसाने यांनी अनुमोदन दिले.
निवडीनंतर अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, “जिल्ह्यातील तसेच राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या अडचणी आणि प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने एकत्र येण्याची गरज आहे. नाशिक जिल्हा सहकारी बँक असोसिएशनची वाटचाल ही विकासात्मक असून, त्या माध्यमातून बँकिंग क्षेत्राला दिशा देणारे उपक्रम आणि कार्यशाळा राबविण्यात येत असल्याचे सांगितले”
असोसिएशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुनील गिते आणि कार्याध्यक्ष अशोक तापडिया यांनीही सांगितले की, “सहकार क्षेत्रात नव्या उमेदीने काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी विधायक उपक्रम हाती घेतले जातील.”
या निवड बैठकीला संचालक नानासाहेब सोनवणे, दत्ताजी गायकवाड, अशोक झंवर, संजय वडनेरे, महेंद्र बोरा, हेमंत धात्रक, कैलास येवला, राजकुमार संकलेचा, नितीन वालखेडे, रत्नाकर कदम, अबिद अहमद तसेच व्यवस्थापक रामलाल सानप आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीचा समारोप वसंतराव खैरनार यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.