

पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थजगतातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित म्हणून ओळखली जाणारी आरबीएल बँक (मूळ रत्नाकर बँक) आता दुबईच्या एमिरातस् एनबीडी (Emirates NBD) या बँकिंग समूहाच्या ताब्यात गेली आहे. तब्बल २६,८५३ कोटी रुपयांचा व्यवहार करून एमिरातस् एनबीडीने आरबीएल बँकेतील ६० टक्के शेअर्स विकत घेतले आहेत.
या करारानंतर आरबीएल बँकेची ९० कोटी ८० लाख शेअर्स प्रत्येकी २८० रुपये दराने विकले गेले. काही दिवसांपूर्वीच या व्यवहाराला नियामक संस्थांनी अंतिम मंजुरी दिली असून सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत.
या ऐतिहासिक करारामुळे शेअर बाजारात खळबळ उडाली असून आरबीएल बँकेचे शेअर्स सहा टक्क्यांनी वाढले आहेत. आरबीएल चे शेअर्स सध्या सुमारे ३२५ रुपयांच्या पातळीवर आहेत.
भारतीय बँकिंग इतिहासातील हा सर्वात मोठा परदेशी गुंतवणुकीचा करार ठरला आहे.
सन १९४३ साली सांगली जिल्ह्यातील समडोळी या छोड्या गावापासून ‘रत्नाकर बँक लिमिटेड’ची स्थापना झाली.
१४ जून १९४३ रोजी अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर केवळ पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण प्रदेशात या बँकेने आर्थिक विश्वासार्हतेची ओळख निर्माण केली.
१९६९ मध्ये बँकेला ‘शेड्युल्ड बँक’चा दर्जा मिळाला आणि १९७० मध्ये बँकिंग परवाना मिळाला.
२०१० नंतर खाजगीकरणाच्या लाटेत बँकेचा ताबा नव्या व्यवस्थापनाकडे गेला. रत्नाकर बँकचे नाव बदलून आरबीएल बँक लि. करण्यात आले.
एमिरातस् एनबीडीने स्पष्ट केले आहे की आरबीएल बँकेच्या सध्याच्या व्यवस्थापनात कोणताही बदल केला जाणार नाही. बँकेचे विद्यमान संचालक आणि वरिष्ठ अधिकारी आपापल्या पदांवर कायम राहतील.
मात्र, पुढील काळात धोरणात्मक निर्णय आणि बँकेच्या विस्तार योजनांमध्ये दुबईच्या बँकेचा सहभाग राहणार आहे.
१९४३ साली एका गावकऱ्याच्या बुद्धी, दूरदृष्टी आणि परिश्रमातून जन्मलेली ही बँक आज २०२५ मध्ये अरब शेखच्या ताब्यात गेली आहे.
समडोळीकरांच्या दृष्टीने ही अभिमान आणि वेदना दोन्हींची वेळ आहे.
गावातून उगवलेली ‘रत्नाकर’ आज जागतिक स्तरावर पोहोचली, पण तिची मुळे मात्र परकीय जमिनीत रोवली गेली आहेत.