अस्सल, बनावट ? नोट ५०० ची; रहस्य उलगडणार चष्मा व शाल गांधीजींची!

भिंगाच्या मदतीने दिसणारी मायक्रो-लेटरिंगच सांगेल नोट खरी की बनावट; जाणून घ्या RBI ची खास टिप.
जाणून घ्या RBI ची खास टिप.
रहस्य उलगडणार
Published on

बाजारात बनावट चलनी नोटांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ५०० रुपयांची खरी आणि बनावट नोट ओळखण्यासाठी अत्यंत सोपी पण प्रभावी माहिती दिली आहे. नोटेवरील 'मायक्रो-लेटरिंग' (Micro-Lettering) हे सुरक्षा वैशिष्ट्य तपासून काही सेकंदांत नोट खरी की बनावट याचा अंदाज घेता येऊ शकतो.

रिझर्व्ह बँकेने सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना जागरूक करत ५०० रुपयांच्या नोटेवरील काही महत्त्वाच्या सुरक्षा वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधले आहे. या वैशिष्ट्यांमध्ये अतिशय सूक्ष्म अक्षरांत लिहिलेली माहिती असते, जी बनावट नोटांमध्ये अचूकपणे तयार करणे जवळपास अशक्य असते

काय आहे 'मायक्रो-लेटरिंग'?

मायक्रो-लेटरिंग म्हणजे नोटेवर अतिशय बारीक अक्षरांमध्ये छापलेले शब्द किंवा चिन्हे. ही अक्षरे सामान्यतः डोळ्यांना स्पष्ट दिसत नाहीत. मात्र भिंगाच्या मदतीने किंवा बारकाईने पाहिल्यास ती सहज ओळखता येतात. हे वैशिष्ट्य चलनी नोटांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

५०० रुपयांची नोट तपासताना या ३ गोष्टी नक्की पहा

१. महात्मा गांधींची शाल

महात्मा गांधी यांच्या छायाचित्रातील शालीच्या घडीवर अतिशय सूक्ष्म अक्षरांत 'Bharat' आणि 'INDIA' असे लिहिलेले असते.

२. गांधीजींचा चष्मा

गांधीजींच्या चष्म्याच्या दांड्यावर 'RBI' ही अतिशय लहान अक्षरे कोरलेली असतात.

३. नोटेची डावी बाजू

नोटेच्या डाव्या बाजूला सूक्ष्म अक्षरांत 'RBI500INDIA' असे मायक्रो-लेटरिंग केलेले असते.

शंका आल्यास काय करावे?

जर व्यवहारादरम्यान मिळालेल्या ५०० रुपयांच्या नोटेबाबत शंका वाटत असेल, तर भिंगाच्या सहाय्याने किंवा काळजीपूर्वक वरील तीन सुरक्षा वैशिष्ट्ये तपासावीत. ही मायक्रो-लेटरिंग वैशिष्ट्ये खऱ्या नोटेवर स्पष्ट दिसतात, तर बनावट नोटांमध्ये ती अनेकदा नसतात किंवा अस्पष्ट असतात.

याशिवाय, नोटेवरील वॉटरमार्क, सिक्युरिटी थ्रेड, रंग बदलणारी संख्या, सी-थ्रू रजिस्टर आणि उभार छपाई (Intaglio Printing) यांसारखी इतर सुरक्षा वैशिष्ट्येदेखील तपासणे आवश्यक आहे.

नागरिकांसाठी रिझर्व्ह बँकेचे आवाहन

रिझर्व्ह बँके ने नागरिकांना कोणतीही नोट स्वीकारण्यापूर्वी ती काळजीपूर्वक तपासण्याचे आवाहन केले आहे. बनावट नोटांचा संशय आल्यास ती पुढे वापरण्याचा प्रयत्न न करता संबंधित बँकेशी किंवा पोलिसांशी संपर्क साधावा. चलनी नोटांबाबत अधिकृत माहिती आणि सुरक्षा वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Banco News
www.banco.news