
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) वित्तीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) चा वापर करत असताना या तंत्रज्ञानाचा जबाबदार आणि नैतिक अवलंब सुनिश्चित करण्यासाठी "FREE-AI फ्रेमवर्क" लागू केला आहे. बँका, एनबीएफसी, फिनटेक आणि पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्ससाठी (PSO) कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) चा वापर करत असताना मजबूत व लवचिक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या उद्देशाने डिसेंबर २०२४ मध्ये सुरू केलेल्या या उपक्रमाचे नेतृत्व आठ सदस्यीय समितीकडे असून, या समितीने नुकताच (१३ ऑगस्ट २०२५ रोजी) आपला अंतिम अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये सहा प्रमुख स्तंभांवर (पायाभूत सुविधा, क्षमता, धोरण, शासकीय व्यवस्था, संरक्षण आणि हमी) आधारित २६ कृतीक्षम शिफारसी केलेल्या आहेत.
मुख्य उद्दिष्टे :
* जागतिक आणि भारतातील AI चा अवलंब, कल आणि मापदंडांचा अभ्यास करणे
* सुरक्षित वापरासाठी नियामक व पर्यवेक्षी दृष्टिकोनांचे मूल्यमापन करणे
* पक्षपात, गोपनीयतेचा भंग आणि गैरवापर यांसारख्या AI-संबंधित जोखमींचे निराकरण करणे
* मजबूत शासन आणि नैतिक चौकट निर्माण करणे
* वित्तीय संस्थांमधील अनुपालन, देखरेख व जोखीम व्यवस्थापन बळकट करणे
RBI चा दृष्टिकोन :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या फ्रेमवर्कद्वारे AI तंत्रज्ञानाचा अवलंब करताना नवकल्पना आणि जोखीम व्यवस्थापनात संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे. जलद विकसित होत असलेल्या AI तंत्रज्ञानात नैतिक तत्त्वांचा समावेश करून, भारताला वित्तीय क्षेत्रातील AI प्रशासनात जागतिक आघाडीवर नेण्याचे उद्दिष्ट यामध्ये ठेवलेले आहे. अंतिम ध्येय म्हणजे सक्षम, सर्वसमावेशक आणि पारदर्शक वित्तीय परिसंस्था उभी करणे, जी AI च्या मदतीने वाढ, समानता आणि सार्वजनिक विश्वास वाढवेल.