

इस्लामपूर: ग्राहकांना सुरक्षित, जलद आणि सोपे डिजिटल आर्थिक व्यवहार करता यावेत यासाठी राजारामबापू सहकारी बँकेने इंटरनेट बँकिंग सुविधा अधिकृतपणे सुरू केली आहे. या सेवेला परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजूर झाल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्री. विजयवराव यादव (बापू) यांनी दिली.
या प्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन श्री. माणिकराव पाटील, संचालक श्री. अशोक पाटील तसेच व्यवस्थापकीय संचालक सीए. प्रदिप बाबर उपस्थित होते.
इंटरनेट बँकिंग सेवा सुरू करण्यापूर्वी, बँकेने सी.बी.एस. सॉफ्टवेअर अपडेट, डेटा मॅनेजमेंट व्यवस्था, तसेच ग्राहकांच्या गोपनीयता व व्यवहार सुरक्षेची सखोल तपासणी केली. केंद्र शासनाच्या Cert-In (Computer Emergency Response Team – India) अंतर्गत नोंदणीकृत ऑडिटरकडून सायबर सिक्युरिटी ऑडिट झाल्यानंतरच या सुविधेस परवानगी मिळाली आहे.
१९८१ मध्ये स्थापनेपासून बँक ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधा देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थापक मा. राजारामबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने आर्थिक समावेशनाचे कार्य प्रभावीपणे राबवले आहे.
आज ही बँक पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य शेड्युल्ड को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जाते. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारले असून एकूण ५० शाखा कार्यरत आहेत.
बँकेची ठेवी: ₹2,550 कोटी
एकूण कर्जपुरवठा: ₹1,750 कोटींहून अधिक
एकूण व्यवसाय: ₹4,300 कोटी
निव्वळ नफा: ₹१६ कोटी ६४ लाख
ढोबळ नफा: ₹५१ कोटी (३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या वर्षात)
प्रति बँक व्यवसाय: ₹10 कोटी ६० लाख
निव्वळ NPA: शून्य टक्के
पाच वर्षांत सलग 12 वेळा “A-A+” ग्रेडिंग
इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना आता पुढील सुविधा २४x७ उपलब्ध असतील –
खाते शिल्लक तपासणे
स्टेटमेंट डाउनलोड
NEFT, RTGS, IMPS द्वारे तात्काळ पैसे पाठवणे
मोबाईल रिचार्ज, डीटीएच, वीज व पाणी बिल भरणे
चेकबुक विनंती, ई-सेवा अर्ज
यामुळे शाखेत प्रत्यक्ष येण्याची गरज कमी होणार असून ग्राहकांचा वेळ व पैसे दोन्ही वाचणार आहेत.
ग्राहकांनी OTP, पासवर्ड, PIN यासारखी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच फक्त अधिकृत बँक वेबसाईट व ॲप वापरण्याचे आवाहन चेअरमन श्री. विजयवराव यादव यांनी केले.
बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दि महाराष्ट्र राज्य नागरी बँक असोसिएशन तसेच महाराष्ट्र राज्य नागरी बँक फेडरेशन यांच्या वतीने यंदा राजारामबापू सहकारी बँकेला उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.