
१९९२ मध्ये जपानस्थित टोयोटा कारखान्यांतील कामगार एका गाडीच्या पार्टचा मागोवा घेण्यासाठी १० वेगवेगळे बारकोड स्कॅन करत होते. ते थकून गेले होते. संपूर्ण प्रणाली बिघडली होती. त्यांच्यात होता एक ३५ वर्षांचा शांत अभियंता, मासाहिरो हारा. मासाहिरोला दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत "गो" हा खेळ खेळायला आवडायचा.
बाकी सगळेजण या समस्यावर चर्चा करीत बसलेले असताना, हारा मात्र काळ्या-पांढऱ्या दगडांच्या पटाकडे एकटक बघत होता. आणि अचानक त्याच्या मनात एक विचार चमकून गेला. “कोड जर "गो" सारखे काम करू शकला तर? फक्त डावीकडून उजवीकडे नाही, तर वरून खालीही? म्हणजेच तेवढ्याच जागेत जास्त माहिती!”
पुढची सहा महिने हारा या कल्पनेवर वेड्यासारखा अभ्यास करत राहिला – तो त्याला मिळेल ते छापील साहित्य, मासिकं, वृत्तपत्रं, पत्रके… सगळं सगळं तपासत राहिला. त्याला असा एक परिपूर्ण नमुना हवा होता, ज्याला स्कॅनर कधीही साध्या मजकुराशी गोंधळणार नाही.
अथक प्रयत्नांनी अखेर त्याने तो फॉर्म्युला शोधलाच– एक "जादुई गुणोत्तर", तीन छोटे चौकोन, जे कोणत्याही कोनातून ताबडतोब वाचले जाऊ शकतात. आणि अशातऱ्हेने १९९४ मध्ये "QR कोड" जन्माला आला.
मासाहिरोची कंपनी "QR कोड"चे सगळे पेटंट करून त्यातून रॉयल्टी घेऊ इच्छित होती. पण इथे मासाहिरो हाराने असा निर्णय घेतला ज्याने सगळ्यांना धक्का बसला –"जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती" हे वचन सार्थ करीत त्याने सर्व मानव जातीचे हित साधणारे हे "QR कोड"पूर्णपणे मोफत दिले." कोणतेही परवाना शुल्क नाही, काहीच घेतले नाही. त्याच्या या निर्णयाने आपल्या "नगदीविरहित जगाची पायाभरणी" केली.
त्याचे सहकारी समजले की, तो वेडा झाला आहे. पण हाराचे म्हणणे होते की, “जर तुम्हाला जग बदलायचं असेल, तर असे तंत्रज्ञान कधीच स्वतःजवळ ठेवू नका, ते सगळ्यांशी वाटा.” आणि यावर त्याचा दृढ विश्वास होता.
आजच्या घडीला फक्त चीनमध्येच दररोज दोन अब्जांहून अधिक व्यवहार केवळ "QR कोड"द्वारे केले जातात. जागतिक QR पेमेंट बाजारपेठ – ३५ अब्ज डॉलर्सची आहे.आणि अजूनही झपाट्याने वाढतेच आहे.