

पुणे: पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.ची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दी पूना मर्चंट्स चेंबर, गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे येथे अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांसाठी १५% लाभांश (डिव्हिडंड) जाहीर करण्यात आला आहे, ज्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सभेच्या सुरुवातीला बँकेचे अध्यक्ष श्री. श्रीधर गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना मागील आर्थिक वर्षातील बँकेच्या कामगिरीचा आढावा मांडला. त्यांनी सांगितले की, बँकेने मागील वर्षात रु. ३,०६३ कोटींचा एकूण व्यवसाय केला असून रु. १९.४५ कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत बँकेने रु. ३५७ कोटींची विक्रमी व्यवसायवाढ नोंदवली असून, नेहमीप्रमाणे याही वर्षी नेट एनपीए (Net NPA) ०% राखण्यात यश मिळवले आहे.
गेल्या ७४ वर्षांपासून निष्कलंक बँकिंग सेवा देणाऱ्या पुणे पीपल्स बँकेच्या सध्या २३ शाखा कार्यरत आहेत. नुकत्याच वेताळ, कात्रज आणि शिवापूर येथे नवीन शाखा सुरू करण्यात आल्या असून, आगामी वर्षात आणखी किमान ४ नवीन शाखा सुरू करण्याचा बँकेचा मानस आहे. अध्यक्षांनी बँकेच्या या यशाचे श्रेय सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय मंडळ तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित योगदानाला दिले आणि सर्वांचे आभार मानले.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बँकेने वर्षभर दरमहा विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले. यामध्ये पुणे पीपल्स पुरस्कार, रक्तदान शिबिर, ७५ उल्लेखनीय महिलांचा सत्कार, वार्षिक स्नेहसंमेलन, बँकिंग गप्पा, वारकऱ्यांना उपयुक्त वस्तूंचे वाटप, कर्मचारी आरोग्य तपासणी, सायबर जनजागृती उपक्रम आणि बँकेच्या नवीन वास्तूचे वास्तुपूजन अशा उपक्रमांचा समावेश होता.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बँकेच्या नवीन मुख्य कार्यालयाची उभारणी हे या वर्षाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. बांधकाम क्षेत्रातील आपल्या अनुभवाचा वापर करून अध्यक्ष श्री. श्रीधर गायकवाड यांनी हे काम पूर्णत्वास नेले. आधुनिक सुविधांनी सुसज्ज, मजबूत आणि सात मजली असणाऱ्या या नव्या वास्तूमुळे "आता आमच्या बँकेची हक्काची सात मजली इमारत आहे" असा अभिमान सभासदांनी व्यक्त केला. अध्यक्ष श्री. गायकवाड यांच्या या तडफदार नेतृत्वाचा सभेच्या वतीने विशेष गौरव व सत्कार करण्यात आला.
सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष ॲड. श्री. सुभाष मोहिते आणि ज्येष्ठ संचालक सीए जयादत्त रणदिवे यांनी समर्पक उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले. तसेच, उत्कृष्ट कामगिरी करणारे सभासद, खातेदार, संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या गुणी पाल्यांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सभेची सुरुवात अहवाल काळात दिवंगत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली, तर सांगता ‘वंदेमातरम्’ने झाली. सभेचे सूत्रसंचालन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांनी केले आणि आभार प्रदर्शन संचालक श्री. बबनराव भेगडे यांनी मानले. बँकेची आर्थिक प्रगती, नवीन इमारत आणि वर्षभरातील सामाजिक उपक्रमांमुळे सर्व सभासदांमधून समाधान व्यक्त होत आहे.