

सध्या सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून आता ऑनलाइन पैसे पाठवून त्याबदल्यात रोख रक्कम घेण्याचा एक नवा स्कॅम समोर आला आहे. अनेक नागरिक मदत किंवा ओळखीच्या नावाखाली अनोळखी लोकांना रोख पैसे देतात; मात्र यामागे मोठे सायबर रॅकेट कार्यरत असल्याचे समोर येत आहे.
मात्र प्रत्यक्षात हे पैसे अनेकदा सायबर गुन्ह्यातून चोरी केलेले किंवा फसवणुकीद्वारे मिळवलेले असतात. स्कॅमर तुमचे खाते ‘मनी रूट’ म्हणून वापरतो आणि स्वतः सुरक्षित राहतो. नंतर सायबर पोलिस तपास करताना पैशांचा माग थेट तुमच्या बँक खात्यापर्यंत पोहोचतो.
यामुळे निष्पाप व्यक्तीलाही चौकशीला सामोरे जावे लागू शकते. अनेक वेळा संशयित व्यवहारामुळे संबंधित बँक खाते तात्पुरते फ्रीज (ब्लॉक) देखील केले जाते. त्यामुळे आर्थिक अडचणींसह मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागू शकते.
तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून ऑनलाइन पैसे स्वीकारून त्याबदल्यात रोख रक्कम देणे टाळावे. तसेच आपल्या बँक खात्यावरील SMS, UPI आणि व्यवहार नोटिफिकेशन्स नियमित तपासत राहणे आवश्यक आहे.
सायबर गुन्हे टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आणि संशयास्पद व्यवहार त्वरित बँक व सायबर पोलिसांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे.