'NCRP' पोर्टलवर रजिस्ट्रेशनसाठी सहकार विभागाची तातडीची बैठक

सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी बँकांचे ऑनबोर्डिंग बंधनकारक; कागदपत्रे आणि प्रक्रिया अपूर्ण असलेल्या बँकांसाठी Google Meet द्वारे विशेष आढावा बैठक आयोजित.
NCRP portal registration - Urban Co-operative Banks Maharashtra
राज्यातील ५८ नागरी सहकारी बँकांचे 'एनसीआरपी' पोर्टलवर रजिस्ट्रेशन प्रलंबित!
Published on: 

पुणे: सायबर फसवणूक आणि आर्थिक सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये तक्रार नोंदवणे, समन्वय साधणे तसेच प्रतिसाद देण्याची यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या 'नॅशनल सायबरक्राइम रिपोर्टिंग पोर्टल' (NCRP) वर राज्यातील नागरी सहकारी बँकांचे (UCBs) रजिस्ट्रेशन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश सहकार विभागाने दिले आहेत. सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयाकडून या संदर्भात सक्त सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

रजिस्ट्रेशनसाठी कोणतेही शुल्क नाही

सहकार विभागाने स्पष्ट केले आहे की, NCRP पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. बँकेची केवळ आवश्यक माहिती सादर करून हे रजिस्ट्रेशन पूर्ण करावयाचे आहे.

५८ बँकांचे रजिस्ट्रेशन अद्याप बाकी

मा. प्रधान सचिव, सहकार व पणन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत या मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील एकूण ४४९ नागरी सहकारी बँकांपैकी तब्बल ५८ बँकांनी अद्याप NCRP पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेले नाही. या प्रलंबित बँकांची विभागनिहाय यादी आणि त्यांची सद्यस्थिती सहकार विभागाने जाहीर केली आहे. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, कोकण, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे आणि सोलापूर यांसारख्या विविध विभागांमधील बँकांचा समावेश आहे. काही बँकांचे कागदपत्रे प्रलंबित आहेत, तर काही ठिकाणी संपर्क होऊ शकलेला नाही किंवा जीएसटी उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

आज दुपारी महत्त्वाची बैठक

या सर्व प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी आणि प्रलंबित बँकांना लवकरात लवकर ऑनबोर्ड करण्यासाठी दिनांक २९/१०/२०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता Google Meet द्वारे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधित बँकांनी अद्ययावत तपशीलासह या बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Attachment
PDF
NCRP letter for vc and list
Preview
Banco News
www.banco.news