नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेला स्वतंत्र 'IFSC Code'

जिल्ह्यातील पहिली 'नॉन-शेड्यूल्ड' बँक ठरली हायटेक; १३ मे पासून थेट RTGS आणि NEFT सेवा सुरू, ग्राहकांना मोठा फायदा.
Nashik Road Deolali Bank -  Marathi Banking News
नाशिक जिल्ह्यातील आधुनिक सेवा देणारी पहिली 'नॉन-शेड्यूल्ड' सहकारी बँक.
Published on

नाशिकरोड: सहकारी बँकिंग क्षेत्रात सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करत ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देणाऱ्या नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) या बँकेला स्वतंत्र आयएफएस कोड (IFS Code) बहाल केला आहे. या सुविधेमुळे आता बँकेच्या व्यवहारांत अधिक गती, अचूकता आणि पारदर्शकता येणार असून, जिल्ह्यातील अशा प्रकारची आधुनिक बँकिंग सेवा देणारी ही पहिली 'नॉन-शेड्यूल्ड' बँक ठरली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी दिली.

१३ मे पासून सेवा कार्यान्वित; सर्व ३१ शाखांना स्वतंत्र कोड

व्यापारी बँकेला नोव्हेंबर २०२५ मध्ये रिझर्व्ह बँकेकडून ‘डायरेक्ट मेंबरशिप’द्वारे स्वतंत्र आयएफएस कोड सुरू करण्याची परवानगी मिळाली होती. या परवानगीची यशस्वी अंमलबजावणी करत, बँकेने १३ मे २०२६ पासून थेट आरटीजीएस (RTGS) आणि एनईएफटी (NEFT) सुविधा सुरू केली आहे.

बँकेच्या प्रधान कार्यालयासह सर्व ३१ शाखांसाठी स्वतंत्र आयएफएस कोड कार्यान्वित करण्यात आले आहेत. यापूर्वी नॉन-शेड्यूल्ड बँकांना अन्य बँकांच्या माध्यमातून (स्पॉन्सर बँक) हे व्यवहार करावे लागत असत, ज्यामुळे प्रक्रियेला वेळ लागत असे. मात्र, आता स्वतंत्र कोड मिळाल्याने बँकेचे ग्राहक, सभासद आणि ठेवीदारांना अत्यंत जलद गतीने आणि विनाअडथळा पैसे पाठवणे तसेच मिळवणे शक्य होणार आहे.

Nashik Road Deolali Bank -  Marathi Banking News
नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचा ₹17.70 कोटींचा ठोस नफा

पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित आणि मजबूत

स्वतंत्र आयएफएस कोड मिळाल्यामुळे बँकेची अंतर्गत पेमेंट प्रणाली आता अधिक सुरक्षित, स्वायत्त आणि मजबूत झाली आहे. तंत्रज्ञानाच्या या मोठ्या विस्तारामुळे ग्राहकांचा बँकेवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. सहकार क्षेत्रातील डिजिटल क्रांतीच्या दिशेने बँकेने टाकलेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

"बँकेची पेमेंट सिस्टीम आता थेट आणि जलद झाली आहे. बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्षा कमल आढाव, ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड आणि जनसंपर्क संचालक नितीन खोले यांनी सर्व सन्माननीय ग्राहक, व्यापारी आणि खातेदारांना आपल्या खात्याशी संबंधित नवीन व अद्ययावत आयएफएस कोड बँकेच्या शाखेशी संपर्क साधून अपडेट करून घेण्याचे आवाहन केले आहे."
Banco News
www.banco.news