नामको बँकेचा ₹४३.३३ कोटींचा विक्रमी नफा; आर्थिक कामगिरीत भक्कम झेप

ठेव, कर्जवाटप आणि एकूण व्यवसायात वाढ; डिजिटल सेवा, नवीन शाखा व ग्राहककेंद्रित धोरणांवर भर
नाशिक मर्चंट्स को-ऑप बँक लि.
बँकेचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश दायमा व संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी व उपस्थित मान्यवर
Published on

नाशिक : नाशिक मर्चंट्स को-ऑप बँक लि. (नामको) बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ₹४३.३३ कोटींचा विक्रमी निव्वळ नफा कमावला आहे. पत्रकार परिषदेत बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती देताना, ठेव, कर्जवाटप आणि एकूण व्यवसायात झालेल्या वाढीमुळे बँकेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट केले.

नाशिक मर्चंट्स को-ऑप बँक लि.
नाशिक मर्चंट बँकेकडून स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतराची तयारी

मागील वर्षात बँकेच्या ठेवींमध्ये मोठी वाढ होऊन त्या ₹२७२१ कोटींवर पोहोचल्या, तर कर्जवाटप ₹१६२७ कोटींवर गेले आहे. एकूण व्यवसाय ₹४३४८ कोटींवर पोहोचला असून त्यात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. बँकेचा सीडी रेशो ५९.८० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तसेच ग्रॉस एनपीएमध्ये घट होऊन तो २.७५ टक्क्यांवर आला असून निव्वळ एनपीए शून्यावर राखण्यात बँकेला यश आले आहे.

बँकेने ₹७१.७० कोटींचा एकूण नफा मिळवला असून सर्व तरतुदी आणि कर वजा जाता ₹४३.३३ कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही बँकेने स्थिर आणि सातत्यपूर्ण कामगिरी केली असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नाशिक मर्चंट्स को-ऑप बँक लि.
दि नाशिक मर्चंट्स बँक सेवकांची पतसंस्था सभासदांना ९% लाभांश जाहीर

पुढील आर्थिक वर्षासाठी बँकेने ₹५१०० कोटींच्या एकूण व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनुसार शाखा विस्तार सुलभ झाल्याने येत्या काळात ५ नवीन शाखा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी ३ शाखा नाशिक शहरात, १ जिल्ह्यात आणि १ राज्याबाहेर सुरू करण्यात येणार आहे. तसेच १० शाखांचे स्थलांतर आणि १० शाखांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा प्रस्तावही बँकेने ठेवला आहे.

डिजिटल बँकिंग सेवांवर भर देत मोबाईल बँकिंग, ऑनलाइन खाते उघडणे, ऑनलाइन कर्ज सुविधा यांसारख्या सेवा अधिक सक्षम केल्या जाणार आहेत. तसेच ग्राहकांना अधिक जलद सेवा देण्यासाठी स्वतःचे UPI हँडल सुरू करण्याचे नियोजन आहे. काही शाखांमध्ये फ्रँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ती पुढे वाढवली जाणार आहे.

कर्मचारी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाशी सुसंगत सेवा देण्यासाठी वर्षभर प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. याशिवाय सौरऊर्जा प्रकल्प राबवून खर्चात बचत आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्याचा बँकेचा मानस आहे.

Banco News
www.banco.news