NAFCUB च्या ४९व्या सभेत "को-ऑप कुंभ २०२५" मध्ये ताकद दाखवण्याचे आवाहन

आधुनिकीकरणाशिवाय सहकारी बँकांचे भविष्य धोक्यात
"नॅफकब"
"नॅफकब"
Published on

नवी दिल्ली नॅफकब (NAFCUB) या नागरी सहकारी बँकांच्या (UCBs) शिखर संस्थेची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत देशभरातील नागरी सहकारी बँका व पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात सुधारणा, भविष्यातील धोरणे आणि क्षेत्रासमोरील आव्हाने यावर अर्थपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या "को-ऑप कुंभ २०२५" या आंतरराष्ट्रीय परिषदेवर विशेष भर देण्यात आला. या महत्त्वपूर्ण परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे, तर केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

NAFCUB च्या अध्यक्ष लक्ष्मी दास म्हणाले की, "गेल्या वर्षभरात नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात अनेक सुधारणा झाल्या असून UCB च्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या काही मागण्या रिझर्व्ह बँकेने पूर्ण केल्या आहेत तर काही अंशतः मान्य केलेल्या आहेत. मात्र, RBI कडून त्वरित उत्तरांची मागणी ही बँकांसमोरील मोठी अडचण असल्याचे त्यांनी नमूद केले. "आमच्या प्रणाली अजून इतक्या सक्षम नाहीत, त्यामुळे त्यामध्ये तातडीने आधुनिकीकरण आणण्याची गरज आहे," असे त्या म्हणाल्या.

त्यांनी यावेळी "राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळ (NUCFDC) चे महत्त्व अधोरेखित केले आणि सर्व UCB नी या छत्री संघटनेचे सदस्य होण्याचे आवाहन केले. "ही तुमची स्वतःची संस्था असून यामध्ये सामील झाल्यास त्याचा तुम्हाला फायदाच होईल," असे त्यांनी सांगितले. तसेच, सर्व सहकारी संस्थांनी "को-ऑप-कुंभ २०२५" मध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी विनंती केली.

परिषदेबाबत त्यांनी सांगितले की, "५०० हून अधिक प्रतिनिधींनी नोंदणी केली असून देशातील १,४५० बँकांनी त्यांचा किमान एक प्रतिनिधी तरी हजर ठेवावा, जेणेकरून या क्षेत्राची सामूहिक ताकद दाखवता येईल."

NAFCUB चे अध्यक्ष एमेरिटस एच.के. पाटील यांनीही NUCFDC ला बळकटी देण्याचे आवाहन केले. "गेल्या चार वर्षांत सहकारी क्षेत्रात सकारात्मक बदल घडले असून RBI आता अधिक सहकार्यशील आहे," असे ते म्हणाले.

NUCFDC चे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता यांनी आपल्या भाषणात संघटनेची उद्दिष्टे मांडली आणि सामूहिक विकास व मजबूत प्रतिनिधित्वासाठी UCB नी या संस्थेचे सदस्य व्हावे, असे आवाहन केले.

सभेत प्रतिनिधींनी RBI आणि केंद्र सरकारकडे नियामक अडचणी, तांत्रिक सुधारणा आणि प्रशासन बळकटीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे ठरवले. सभेचा समारोप आशावाद आणि नव्या उर्जेच्या वातावरणात झाला. भागधारकांनी को-ऑप कुंभ २०२५ ही शहरी सहकारी पत क्षेत्रासाठी ऐतिहासिक घटना ठरेल, जी या क्षेत्राला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर नवे बळ, मान्यता व दृश्यमानता देईल, असा विश्वास सर्वानी व्यक्त केला.

Banco News
www.banco.news