

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक, लोकाभिमुख आणि भविष्याभिमुख करण्यासाठी 'सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य' आणि 'दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि.' (MSC Bank) यांच्या संयुक्त विद्यमाने एक स्तुत्य व नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. "आपली सूचना - सहकाराच्या नव्या वाटचालीचा पाया" या संकल्पनेअंतर्गत यंदाच्या सहकार सप्ताह २०२६ चे औचित्य साधून राज्यातील जनतेकडून थेट सूचना आणि कल्पना मागविण्यात येत आहेत. उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण सूचना मांडणाऱ्या नागरिकांना आकर्षक रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.
२९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत राज्यभरात 'सहकार सप्ताह' साजरा करण्यात आला. सहकार क्षेत्राला आधुनिकतेची जोड देतानाच त्यात सर्वसामान्य घटकांचा सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी केवळ तज्ज्ञच नव्हे, तर राज्यातील सर्व नागरिक, शेतकरी, सहकारी संस्थांचे सभासद, तरुण, महिला, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि अभ्यासक अशा सर्व स्तरांतील घटकांकडून त्यांच्या मोलाच्या कल्पना मागवण्यात आल्या आहेत. तुमच्या एका चांगल्या सूचनेमुळे सहकार क्षेत्राच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेला एक नवी आणि सकारात्मक दिशा मिळू शकते.
जनतेकडून येणाऱ्या सूचनांमधून सर्वोत्कृष्ट आणि मार्गदर्शक ठरणाऱ्या सूचनांची निवड केली जाईल. निवड झालेल्या विजेत्यांना खालीलप्रमाणे रोख बक्षिसे व प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात येतील:
पहिले पारितोषिक: ₹ २१,१११/-
दुसरे पारितोषिक: ₹ १५,५५५/-
तिसरे पारितोषिक: ₹ ११,१११/-
चौथे पारितोषिक: ₹ ५,५५५/-
पाचवे पारितोषिक: ₹ १,१११/-
उत्तेजनार्थ पारितोषिके: प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाईल.
नागरिकांना आपल्या सूचना व कल्पना ३१ जुलै २०२६ पर्यंत पाठवता येतील. या सूचना खालील पत्त्यावर टपालाद्वारे किंवा ई-मेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे:
ई-मेल आयडी: msc.advisorycell@gmail.com
पत्रासाठी पत्ता (हेड ऑफिस): दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., सर विठ्ठलदास ठाकरे मेमोरिअल बिल्डिंग, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई - ४०० ००१.
अधिकृत वेबसाईट: https://www.mscbank.in
सहकार क्षेत्राच्या या नव्या वाटचालीत आणि प्रगतीमध्ये आपले योगदान देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी, विशेषतः शेतकरी व तरुणांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना नोंदवाव्यात, असे आवाहन सहकार आयुक्त व निबंधक (सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य) मा. श्री. दिपक तावरे (भा.प्र.से.) आणि दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेचे प्रशासक मा. श्री. विद्याधर अनास्कर यांनी केले आहे.
सहकार क्षेत्राला अधिक पारदर्शक आणि गतिमान बनवण्याची ही एक सुवर्णसंधी असून, महाराष्ट्राच्या समृद्ध सहकार परंपरेला अधिक उंचावण्यासाठी जनतेचा प्रतिसाद कसा लाभतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.