
कोल्हापूर : दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि., कोल्हापूरच्या अध्यक्षपदी शाहूवाडी तालुक्यातील शिवाजी रोडे - पाटील, तर उपाध्यक्षपदी करवीर तालुक्यातील सुरेश कोळी यांची बिनविरोध निवड झाली. बँकेच्या सभागृहात सहायक निबंधक प्रेरणा शिवदास यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडीनंतर संचालक व अधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष रोडे-पाटील म्हणाले की, "बँकेचा कारभार पारदर्शी ठेवून ठेवी व व्यवसायात वाढ करणे, तसेच सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध राहू," असे आश्वासन दिले. या निवडीनंतर ज्येष्ठ संचालक व अधिकाऱ्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या गौरवपर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संचालक मंडळ, सुकाणू समिती सदस्य व सभासदांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.