
कोल्हापूर येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी चेअरमन वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ हे होते. यावेळी श्री. मुश्रीफ म्हणाले की, "कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ही प्रत्येक सभासदाचे हक्काचे व्यासपीठ आहे. त्यांना प्रश्न विचारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देणे ही सर्व संचालकांची जबाबदारी आहे. पारदर्शी कारभारासाठी ते अत्यंत गरजेचे आहे."
आशिया खंडातील सर्वात मोठ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या उद्या बुधवारी (दि. १० सप्टेंबर) होत असलेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळेच या सभेमध्ये विचारण्यात आलेल्या सभासदांच्या सर्व प्रश्नांची अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आणि समयसुचकपणे उत्तरे देऊन मंत्री मुश्रीफ यांनी ही सभा एकहाती सांभाळली.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे नेते संचालक आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमल महाडिक, माजी आमदार राजेश नरसिंह पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक, अर्जुन आबिटकर, भैया माने तसेच महिला प्रतिनिधी स्मिता युवराज गवळी यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
सभासदांनी ऐनवेळीच्या विषयात विचारलेले विविध प्रश्न हे यावेळी मुख्यत्वाने चर्चेला घेण्यात आले. सरसाकट कर्जमाफी द्यावी आणि त्यासाठी आपण सर्वांनी सामुदायिक पाठपुरावा करण्याचे अभिवचन यावेळी चेअरमन मुश्रीफ यांनी या प्रश्नासंदर्भात दिले. तसेच मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता पूर्ण व्हावे , तसेच शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा,असे ठरावही एकमताने मंजूर करण्यात आले. दौलत साखर कारखान्याला पाठबळ दिल्याबद्दल आणि सर्वाधिक नफा मिळवल्याबद्दल सभासदांनी विद्यमान संचालक वर्गाचे अभिनंदन केले.