कासामध्ये जव्हार अर्बन बँकेच्या ७ व्या हायटेक शाखेचे थाटात उद्घाटन!

सामान्य जनतेला आधार देणारी आपली हक्काची बँक आता कासाच्या प्रगतीचे सारथ्य करणार.
Jawhar Urban Bank financial result 2026 - Jawhar Urban Bank Kasa branch address
सहकारातील 'झिरो % नेट NPA' फेम जव्हार अर्बन बँकेची कासात नवी भरारी!
Published on

कासा : "विश्वासाचा वारसा... प्रगतीचा नवा अध्याय" या ब्रीदवाक्याला अत्यंत सार्थ ठरवत, जव्हार संस्थानचे राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे यांनी स्थापन केलेल्या 'दि जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.'च्या सातव्या 'कासा' शाखेचे आणि एटीएम केंद्राचे उद्घाटन अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले. ग्रामीण आणि आदिवासी भागातील जनतेला आधुनिक, सुरक्षित व गतिमान बँकिंग सेवा पुरवण्याच्या उद्दिष्टाने सुरू झालेली ही शाखा स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती देईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था (महाराष्ट्र) चे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते मा. श्री. निलेशजी भगवान सांबरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष मा. श्री. आनंदरावजी अडसूळ हे होते.

या ऐतिहासिक प्रसंगी कासा गावच्या सरपंच सौ. सुनिताताई कामडी आणि पालघर जिल्ह्याचे सहकारी संस्था उपनिबंधक मा. श्री. किशन रत्नाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक श्री. निलेशजी सांबरे, जव्हार नगर परिषदेच्या नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेविका सौ. गीताताई चौधरी, आणि जव्हार अर्बन बँकेचे नवनिर्वाचित संचालक श्री. धीरज निलेश सांबरे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Jawhar Urban Bank financial result 2026 - Jawhar Urban Bank Kasa branch address
जव्हार अर्बन बँकेचा 'सुवर्ण' प्रवास! १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार!

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. प्रसाद बाबुराव मुकणे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी बँकेच्या आजवरच्या यशस्वी प्रवासाचा आलेख मांडताना सांगितले की:

  • सुरक्षितता: ठेवीदारांच्या पैशांची सुरक्षितता राखण्यासाठी बँक कटिबद्ध आहे.

  • आर्थिक शिस्त: बँकेची कर्ज वसुली अत्यंत सक्षम असून, बँकेचा ग्रॉस एन.पी.ए. (Gross NPA) ४.२२% आणि नेट एन.पी.ए. (Net NPA) चक्क ०% इतका उत्कृष्ट राखण्यात बँक यशस्वी ठरली आहे.

  • पुरस्कार: उत्कृष्ट कामगिरीमुळे बँकेला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

यानंतर बोलताना संचालक श्री. प्रवीण राजाराम मुकणे यांनी सांगितले की, ग्राहकांना कमीत कमी व्याजदरामध्ये कर्जपुरवठा व्हावा, हीच संचालक मंडळाची प्राथमिक भूमिका राहिलेली आहे.

कासा ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. हरेश मुकणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कासा येथे ही शाखा सुरू झाल्यामुळे स्थानिक व्यापारी, शेतकरी, महिला बचत गट आणि बेरोजगार युवकांना थेट आणि मोठा आर्थिक फायदा होईल. त्यांनी शाखा सुरू केल्याबद्दल संचालक मंडळाचे मनापासून आभार मानले.

तसेच जिल्हा उपनिबंधक श्री. किशन रत्नाळे यांनी सहकाराच्या शक्तीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले,

"राष्ट्रीयकृत बँकांचे जाळे मोठे असले, तरीही सामान्य जनता आणि व्यापाऱ्यांना अडचणीच्या काळात सर्वप्रथम मदतीचा हात सहकारी बँकांकडूनच मिळतो."

उद्घाटक श्री. निलेशजी सांबरे यांनी जव्हार अर्बन बँकेच्या पारदर्शक कामकाजाचे कौतुक केले. ते म्हणाले,

"बँकेचे संचालक मंडळ सजग असून एन.पी.ए. कमी राखण्यात त्यांना यश आले आहे. या भागात आता 'वाढवण बंदर' आकारास येत आहे. या मोठ्या प्रकल्पामुळे येणारी आर्थिक सुबत्ता स्थानिक जनतेने व शेतकऱ्यांनी जव्हार अर्बन बँकेत विश्वासाने गुंतवावी. तुमचा पैसा इथे पूर्णपणे सुरक्षित राहील."

समारंभाचे अध्यक्ष मा. श्री. आनंदरावजी अडसूळ यांनी सहकार क्षेत्रातील आपल्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाचे दाखले देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले:

"या परिसरात वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेन सारखे मोठे प्रकल्प येत आहेत. अशा वेळी तरुणांना स्वयंरोजगारासाठी आणि उद्योगांसाठी बँकेने भागभांडवल व कर्जपुरवठा केला पाहिजे. मात्र, त्याच वेळी कर्जाच्या काटेकोर वसुलीचे पालन करणेही तितकेच गरजेचे आहे. ग्राहकांचा निस्सीम विश्वास हीच सहकारी बँकांची सर्वात मोठी संपत्ती आहे."

या यशस्वी सोहळ्याचे आभार प्रदर्शन बँकेचे संचालक श्री. रियाज मणियार यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, व्यापारी, सभासद व ग्राहकांचे आभार मानले.

या उद्घाटन सोहळ्यास बँकेचे सर्व संचालक मंडळ, सभासद, अधिकारी, कर्मचारी तसेच कासा व परिसरातील नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कासा येथील या अत्याधुनिक शाखेमुळे परिसरातील आर्थिक विकासाला मोठी गती मिळून सहकारातून समृद्धीचा नवा मार्ग प्रशस्त होणार आहे.

Banco News
www.banco.news