जव्हार अर्बन को-ऑप बँकेची वार्षिक सभा उत्साहात

८% लाभांश जाहीर : बँकेचा राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
जव्हार अर्बन को-ऑप बँक
बँकेचे चेअरमन श्री.निलेश ज.पाटील व सोबत संचालक मंडळ.
Published on

जव्हार येथील दि जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जव्हारची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन श्री. निलेश ज. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बँकेचे संस्थापक श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराजा जव्हार संस्थान आणि लक्ष्मी मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, श्रीफळ वाढवून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

श्री. निलेश पाटील यांनी आपल्या मनोगतात बँकेच्या स्थापनेपासून सामान्य लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँक कशी आधारस्तंभ ठरली याबाबत माहिती दिली. सन २०१५ पासून बँकेवर सुपरवायझरी ॲक्शन अंतर्गत निर्बंध होते. परंतु जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व बँकेचे मार्गदर्शक श्री. निलेश भ. सांबरे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली, संचालक मंडळाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कुशल व्यवस्थापनामुळे बँकेने नियोजनबद्ध कामकाज, शिस्तबद्ध व पारदर्शक प्रशासन, कर्ज वसुली आणि योग्य आर्थिक धोरणे राबवून सभासद, ठेवीदार आणि हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे उल्लेखनीय प्रगती साधली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एनपीएचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करण्यात यश मिळाले. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेवरील निर्बंध तत्काळ हटविल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. याशिवाय, २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी बँकेला राष्ट्रीय व राज्यस्तरीय दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

बँकेने कर्ज मर्यादा वाढवून व्याजदर कमी केले असून जनतेस फ्रॅंकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ पासून कंटिन्यूअस क्लिअरिंग सेवा सुरू होणार असून ग्राहकांना एका दिवसात क्लिअरिंगचा लाभ मिळणार आहे. अनेक वर्ष डिव्हिडंड न मिळाल्याची खंत व्यक्त करत बँकेने २०२४-२५ या वर्षासाठी ८% लाभांश जाहीर केला. तसेच बँकेस ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त झाला असून संचालक मंडळाने मिळणाऱ्या भत्त्यातून जव्हार शहरासाठी वैकुंठ रथ लोकार्पण करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद बा. मुकणे यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीसंदर्भात सभेत सविस्तर माहिती दिली. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी त्यांनी स्वतःसह बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले परिश्रम, तसेच संचालक मंडळाने दिलेले खंबीर पाठबळ आणि कर्जदारांनी केलेले सहकार्य यामुळे कर्ज वसुली शक्य झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एनपीए संबंधी असलेल्या निकषांची माहिती देत कर्जदारांनी बँकेच्या प्रगती व हितासाठी नियमितपणे कर्जाचे हप्ते भरण्याचे आवाहन केले.

सभेच्या शेवटी चेअरमन यांनी संचालक मंडळाच्या वतीने, सर्व सभासद, ठेवीदार आणि हितचिंतक यांचे सहकार्याबद्दल आभार मानले व बँकेच्या प्रगतीसाठी पुढेही अशीच साथ मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सभेतील उपस्थितांनी बँकेच्या प्रगतीवर विश्वास व्यक्त करत समाधान आणि अभिनंदन केले. आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने सभा संपन्न झाली.

Banco News
www.banco.news