धाराशिव जनता सहकारी बँकेचा विक्रमी नफा 48.54 कोटी

3134 कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण ९४ व्या वर्षात दमदार प्रवेश
धाराशिव जनता सहकारी बँक
धाराशिव जनता सहकारी बँक
Published on

मराठवाड्यातील अग्रगण्य नागरी सहकारी बँक असलेल्या धाराशिव जनता सहकारी बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत ४८.५४ कोटी रुपयांचा विक्रमी नफा नोंदवला आहे. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेने ३१३४ कोटी रुपयांचा एकूण बँकिंग व्यवसाय टप्पा पूर्ण केला असून, विश्वासाच्या ९४ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे.

महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांत कार्यरत असलेल्या या बँकेने ग्रामीण भागात सेवा देत असतानाही आर्थिक प्रगतीचा वेग कायम ठेवला आहे. सध्या बँकेच्या महाराष्ट्रात ३१ आणि कर्नाटकात ३ अशा एकूण ३४ शाखा कार्यरत आहेत. सर्व शाखा कोअर बँकिंग प्रणाली (CBS) अंतर्गत कार्यरत असून ग्राहकांना जलद आणि सुरक्षित सेवा दिली जात आहे.

ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन बँकेने सेंट्रलाइज्ड चेक क्लिअरिंग, RTGS/NEFT, SMS अलर्ट, मोबाईल बँकिंग अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच धाराशिव, लातूर, उदगीर, बार्शी, बीड, सोलापूर, पंढरपूर, भूम, परंडा, नळदुर्ग, व अहमदपूर अशा ठिकाणी स्वमालकीच्या इमारतींमध्ये सोलार सिस्टीमसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

बँकेच्या संचालक मंडळाच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणामुळे व्यवसायात सातत्याने वाढ होत असून, रिझर्व्ह बँकेच्या सक्षम व सुस्थित बँकांसाठीच्या निकषांचे पालन करण्यात बँक यशस्वी ठरली आहे. मागील वर्षी सभासदांना ८ टक्के लाभांश देण्यात आला होता.

बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठीही कल्याणकारी उपक्रम राबवले असून प्रत्येक कर्मचाऱ्यास ३ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण देण्यात आले आहे.

“सर्वांच्या योगदानामुळेच हे यश शक्य झाले,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय एस. घोडके यांनी नमूद केले. बँकेचे अध्यक्ष वसंत नागदे, उपाध्यक्ष व्ही. जी. शिंदे, जेष्ठ संचालक व्ही.जे. शिंदे तसेच सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, बँकेने चालू वर्षात केंद्र सरकारला १६ कोटी रुपयांचा आयकर भरला आहे. मागील तीन वर्षांत उल्लेखनीय कामगिरीमुळे बँकेला विविध स्तरांवर एकूण ९ पुरस्कार मिळाले आहेत. तसेच स्वतःचा IFSC कोड आणि शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

अध्यक्ष वसंत नागदे यांनी कर्जदारांना वेळेत कर्ज परतफेड करण्याचे आवाहन करत, बँकेच्या प्रगतीत सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Banco News
www.banco.news