

दरवर्षी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी जगभरात 'आंतरराष्ट्रीय सहकार दिन' उत्साहाने साजरा केला जातो. एका शतकाहून अधिक काळापासून ही परंपरा सुरू असून, १९९५ मध्ये इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह अलायन्स (ICA) च्या शताब्दी वर्षानिमित्त संयुक्त राष्ट्र महासभेने अधिकृतपणे या दिनाची घोषणा केली. यंदा संयुक्त राष्ट्रसंघाने "जागतिक शांततेत सहकाराचे योगदान" (Cooperatives: Building a Better Future for All) ही चालू काळाशी सुसंगत व समर्पक संकल्पना मांडली आहे.
सहकारी संस्था नफ्यापेक्षा लोक आणि पृथ्वीला प्राधान्य देत असल्याने, त्यांची नैतिक रचना संयुक्त राष्ट्रांच्या २०३० च्या अजेंड्याला मूलतःच पूरक ठरते. जागतिक अशांततेच्या व असमानतेच्या या काळात विकसित व विकसनशील राष्ट्रात, तिसर्या जगात व श्रीमत व गरीब लोकसंख्येतील दरी वाढत असताना 'Cooperatives: Driving Inclusive and Sustainable Solutions for a Better World' हे घोषवाक्य सहकाराचे खरे स्वरूप दर्शवते. सहकार ही केवळ एक आर्थिक संस्था नसून, ती लोकशाही मूल्यांवर आधारित एक मोठी सामाजिक चळवळ आहे. भारतासारख्या विकसनशील देशात, जिथे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा सहकारी संस्था आहेत, तिथे ही चळवळ बेरोजगारी, वाढती विषमता आणि हवामान बदलांसारख्या आव्हानांशी लढण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
बदलत्या काळातील 'सहकार' समोरील आव्हाने: तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा
सहकार क्षेत्राचा इतिहास गौरवशाली असला तरी, आजच्या डिजिटल युगात या क्षेत्रासमोर काही नवी आणि मोठी आव्हाने उभी आहेत. बँक आणि वित्तीय संस्थांमध्ये तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा शिरकाव ही क्रांती असली तरी, त्यासोबतच काही धोकेही निर्माण झाले आहेत:
१. सायबर सुरक्षा (Cyber Security): सहकारी बँकिंग क्षेत्रात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढल्याने सायबर फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. फिशिंग, डेटा चोरी आणि ऑनलाइन फसवणुकीपासून ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक सहकारी संस्थेने आता प्रगत 'सायबर सुरक्षा कवच' उभारणे अनिवार्य झाले आहे.
२. तंत्रज्ञान स्वीकार (Adoption of Technology): अनेक जुन्या सहकारी संस्था आजही पारंपारिक पद्धतींनी काम करत आहेत. वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि ग्राहकांना जलद सेवा देण्यासाठी एआय (AI - Artificial Intelligence) आणि क्लाउड आधारित बँकिंग प्रणालींचा वापर करणे आता काळाची गरज बनले आहे.
३. पारदर्शकता आणि प्रशासन: तंत्रज्ञानाचा वापर केवळ व्यवहारांसाठी न करता, प्रशासकीय पारदर्शकता वाढवण्यासाठी करणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारमुक्त आणि धोरणात्मकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी 'डिजिटल ऑडिट' आणि 'रिअल-टाइम मॉनिटरिंग' ही नवी साधने महत्त्वाची ठरणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय सहकार दिनी आपण केवळ जुन्या मूल्यांचे स्मरण न करता, नव्या धोरणांची आखणी करण्याची शपथ घेण्याची वेळ आहे. पारंपारिक मूल्यांना जपत नव्या काळातील तंत्रज्ञान आत्मसात करणारी सहकारी धोरणे आखणे गरजेचे आहे. विशेषतः ग्रामीण भागातील बँकांमध्ये प्रशिक्षण, नेतृत्व विकास आणि नवसृजनशील (Innovation) विचारांची रुजवणूक करूनच आपण खऱ्या अर्थाने शाश्वत विकास साधू शकू.
सहकार्याने होणारा विकास हा नेहमीच पर्यावरणस्नेही आणि लोकहिताचा असतो. म्हणूनच, सहकार ही संकल्पना आता केवळ जुन्या पिढीपुरती मर्यादित न ठेवता ती युवा पिढीपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आजच्या डिजिटल जगात 'सहकार' हाच विकासाचा सर्वात सुरक्षित आणि सर्वसमावेशक पर्याय आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त 'बँको' परिवार सर्व सहकारी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. चला, डिजिटल क्रांती आणि सहकाराच्या बळावर एक सक्षम भारत घडवूया!