
"हिमाचल प्रदेश राज्य सहकारी बँकेत आता सायबर हॅकिंग होणार नाही यासाठी बँक इन्फोसिसच्या फिनाकल आवृत्तीचा वापर करेल. या संदर्भात नुकताच बँक व्यवस्थापन आणि इन्फोसिसची उपकंपनी एजव्हर्व्ह सिस्टम बंगळुरू आणि डायनाकॉन सिस्टम अँड सोल्युशन कंपनी मुंबई यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे. बँकेत नवीन सॉफ्टवेअर आवृत्तीमध्ये डेटा ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मार्च २०२६ पर्यंत ती पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सायबर हॅकिंगच्या घटनांची शक्यता आता शून्य असेल, अशी माहिती हिमाचल प्रदेश राज्य सहकारी बँकेचेअध्यक्ष देवेंद्र श्याम यांनी दिली.
बँकेने तिच्या सध्याच्या कोअर बँकिंग सोल्यूशनचे अपग्रेडेशन करण्यासाठी आणि नाबार्डच्या छत्राखाली तिच्या कामकाजात नवीनतम आवृत्ती इन्फोसिस फिनाकल १०.२.२५ चालविण्यासाठी सेवा स्तर कराराची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. बँकेचे अध्यक्ष देवेंद्र श्याम आणि नाबार्ड शिमलाचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. विवेक पठानिया यांच्या उपस्थितीत आणि नवीन तंत्रज्ञानाभिमुख उपक्रमाच्या शुभारंभात व्यवस्थापकीय संचालक श्रावण मानता आणि एजन्सीच्या वतीने अधिकृत अधिकारी यांनी या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली.
यावेळी देवेंद्र श्याम म्हणाले की, "२०२३ मध्ये सध्याच्या संचालक मंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. बँक ज्या कोअर बँकिंग सोल्यूशनमध्ये काम करत आहे, त्या प्रणालीमध्ये आजच्या बँकिंग आवश्यकतांनुसार अनेक त्रुटी दिसत होत्या. ग्राहकांना व्यवहार करताना गैरसोय होत होती, त्यामुळे बँकेच्या व्यवसायावरही परिणाम होत होता. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील कठीण स्पर्धा पाहता, हे सॉफ्टवेअर नवीन तंत्रज्ञानाने बदलण्याचा निर्णय घेण्यात आला."
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण मानता म्हणाले की, " सहकारी बँका आता आघाडीच्या राष्ट्रीयीकृत आणि खाजगी क्षेत्रातील बँकांच्या धर्तीवर आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या डिजिटल सेवा प्रदान करण्यास सक्षम असतील".