

सांगली: शहरातील सांगली अर्बन बँकेच्या टिंबर एरिया शाखेत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा भरण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खातेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राशद जावेद मुल्ला (वय ४९, रा. अभिनव शाळेजवळ, शामरावनगर, सांगली) याने १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सांगली अर्बन बँकेच्या टिंबर एरिया शाखेत पाचशे रुपयांच्या एकूण १९ नोटांचा भरणा केला होता. नियमित तपासणीदरम्यान सदर नोटा बनावट असल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
बँकेतील रोखपाल विश्वास आत्माराम पाटील (रा. हरूगडे प्लॉट, सांगलीवाडी) यांनी या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्राथमिक तपासाअंती नोटा बनावट असल्याची खात्री झाल्यानंतर बुधवारी रात्री विश्रामबाग पोलिस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली.
त्यानुसार राशद मुल्ला याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्या आरोपीकडून चौकशी सुरू असून, या बनावट नोटांचा स्रोत काय आहे, इतर कुणी यात सहभागी आहे का, तसेच यापूर्वीही अशा प्रकारचे व्यवहार झाले आहेत का, याचा सखोल तपास केला जात आहे.
दरम्यान, बँक व्यवस्थापनाने ग्राहकांना बँकेत रोख व्यवहार करताना दक्षता बाळगण्याचे आवाहन केले असून, बनावट नोटांबाबत संशय आल्यास तात्काळ बँक अथवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
बनावट नोटांच्या वाढत्या प्रकारांमुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणामुळे शहरातील बँकिंग व्यवस्थेत खळबळ उडाली आहे.