

आजच्या डिजिटल युगात बँक खाती, गुंतवणूक, विमा पॉलिसी आणि ऑनलाइन पासवर्ड्स यासारखी अनेक आर्थिक साधने प्रत्येक व्यक्तीकडे असतात. मात्र, अचानक मृत्यू झाल्यास व कुटुंबीयांना या सर्व गोष्टींची माहिती नसल्यास मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपली संपत्ती वारसांपर्यंत सुरळीतपणे पोहोचेल यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
सर्वप्रथम,आपल्या वैयक्तिक ओळखीसंबंधित कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच बँक खात्यांची आणि मालमत्तेची नोंद असलेली कागदपत्रे एका सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. ही कागदपत्रे वारसांना सहज सापडतील याची व्यवस्था करणे महत्त्वाचे ठरते.
तसेच, आर्थिक गुंतवणुकींची स्पष्ट माहिती ठेवणेही गरजेचे आहे. बँक खाती, फिक्स्ड डिपॉझिट, शेअर्स, म्युच्युअल फंड, विमा पॉलिसी यांची यादी तयार करून ती विश्वासू व्यक्ती किंवा कुटुंबीयांसोबत शेअर करावी. प्रत्येक खात्यासाठी नामनिर्देशित (Nominee) व्यक्ती निश्चित केल्यास वारसांना संपत्ती मिळवणे सोपे जाते.
कायदेशीर कागदपत्रांमध्ये ‘वसीयत’ - 'मृत्यूपत्र' (Will) हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. 'मृत्यूपत्र' तयार करून त्यात संपत्तीचे वाटप स्पष्टपणे नमूद केल्यास भविष्यातील वाद टाळता येतात. वकील किंवा कायदेशीर सल्लागाराच्या मदतीने वसीयत तयार करणे अधिक सुरक्षित ठरते.
रिअल इस्टेट आणि व्यवसायाशी संबंधित कागदपत्रेही व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. घर, जमीन, दुकान किंवा व्यवसायाची मालकी दर्शवणारी सर्व कागदपत्रे एकत्रित करून ठेवावीत. तसेच व्यवसाय असल्यास त्याचे अधिकार आणि जबाबदाऱ्या कोणाकडे जाणार याची स्पष्ट नोंद करावी.
डिजिटल युगात ऑनलाइन अकाउंट्स आणि पासवर्ड्स यांचे व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे आहे. ईमेल, सोशल मीडिया, बँकिंग अँप्स आणि इतर डिजिटल सेवांचे पासवर्ड सुरक्षित पद्धतीने जतन करावेत. शक्य असल्यास पासवर्ड मॅनेजरचा वापर करावा किंवा ही माहिती विश्वासू व्यक्तीकडे ठेवावी.
संपत्तीचे योग्य नियोजन केल्यास मृत्यूनंतर कुटुंबीयांना आर्थिक आणि कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे वेळेत नियोजन करून आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.