

सहकारी बँकिंग क्षेत्राचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांचे १६ एप्रिल २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. त्यांच्या निधनामुळे सहकार चळवळीतील एक प्रगल्भ अभ्यासक आणि दीपस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत असून, सहकारी बँकिंग जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
बँकिंग क्षेत्रातील ४६ वर्षांचे 'सुवर्ण' पर्व
डॉ. अभ्यंकर यांनी तब्बल ४६ वर्षांहून अधिक काळ कॉसमॉस बँकेच्या संचालक मंडळात सक्रिय योगदान दिले. १९७८ पासून बँकेशी जोडले गेलेल्या डॉ. अभ्यंकर यांनी विक्रमी ९ वेळा बँकेचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या कल्पक आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली कॉसमॉस बँकेने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावर एक अग्रगण्य आणि तंत्रस्नेही सहकारी बँक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
राष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक नेतृत्व
केवळ एका बँकेपुरते मर्यादित न राहता, त्यांनी राष्ट्रीय पातळीवरही सहकार चळवळीला दिशा दिली:
नॅफकब (NAFCUB): नवी दिल्ली येथील या राष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सहकारी बँकांच्या समस्या केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेसमोर अत्यंत प्रभावीपणे मांडल्या.
रिझर्व्ह बँक (RBI): आरबीआयच्या विविध महत्त्वपूर्ण धोरण निश्चिती समित्यांवर त्यांनी तज्ज्ञ सदस्य म्हणून काम केले.
शिक्षण क्षेत्र: बँकिंगसोबतच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा मोठा दबदबा होता. पुणे विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता म्हणून त्यांनी उल्लेखनीय जबाबदारी पार पाडली होती.
डॉ. अभ्यंकर आणि 'बँको' समूह: सहकार चळवळीचा वैचारिक संगम
डॉ. मुकुंद अभ्यंकर आणि 'बँको' समूहाचे नाते केवळ व्यावसायिक नसून ते वैचारिक आणि मार्गदर्शकाचे होते. 'बँको'ला त्यांनी एका पालकाप्रमाणे खंबीर साथ दिली. २०१५-२०१६ मधील 'बँको ब्ल्यू रिबन अवॉर्ड्स' मधील त्यांची प्रेरणादायी भाषणे आजही सहकार कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरतात.
'बँको' मासिकाच्या माध्यमातून बँकिंग विषयांवर मांडलेल्या विचारावर ते नेहमी अभ्यासपूरक चर्चा करून विषयांचे साधेकरण करून सामान्य व्यक्तिला समजेल अशा सोप्या भाषेत मांडण्याबाबत आग्रही राहायचे. त्याच्या जाण्याने आम्ही एक हक्काचा आधार आणि मार्गदर्शक गमावला आहे. यांच्या जाण्याने बँकिंग क्षेत्राच्या अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्वाचा अंत झाला आहे.
'बँको' परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉ. मुकुंद अभ्यंकर यांच्या निधनाने एका ज्ञानपर्वाचा अस्त झाला आहे. त्यांच्या निधनाने 'बँको'ने आपला एक आधारवड गमावला असून, एका मार्गदर्शकाची साथ सुटली. त्यांच्या पवित्र स्मृतींना 'बँको' परिवारातर्फे कोटी कोटी प्रणाम