
कोल्हापूर महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था या सर्वसामान्यांचा खरा आधार असून या पतसंस्था टिकल्या पाहिजेतच नव्हे तर अधिक बळकट झाल्या पाहिजेत. कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन पतसंस्थांना आधार देण्याचे आदर्शवत काम करत आहे. राज्य शासनाच्या स्तरावर मी देखील सातत्याने यासाठी प्रयत्नशील राहीन, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा, कोल्हापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचा रौप्य महोत्सवी सोहळा, पुरस्कार वितरण व भेटवस्तू वितरण सोहळा व विविध धोरणे पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी भूषवले.
अध्यक्षीय मनोगतात राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की, “कोल्हापूर जिल्हा फेडरेशन ही महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मागे खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे अंशदानाचा प्रश्न असो किंवा सहकारी पतसंस्थांचे इतर कोणतेही प्रश्न असोत, त्यांचे सकारात्मक निवारण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
प्रमुख पाहुणे प्रकाश आबिटकर म्हणाले की, “महाराष्ट्राची पतसंस्था चळवळ ही सर्वसामान्यांना आधार देणारी चळवळ आहे. या चळवळीला बळकटी मिळावी यासाठी मी विधिमंडळ व कॅबिनेट बैठकीत सहकारी पतसंस्थांचा आवाज मांडत आहे. सहकारी पतसंस्थांकडून अंशदान वसूल करणे हा अन्यायकारक निर्णय असून त्यास मी विधिमंडळ व कॅबिनेट बैठकीत कायम विरोध करत आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा फेडरेशन व राज्य फेडरेशन यांनी सुचविलेल्या योजनेचा मी वैयक्तिकरित्या पाठपुरावा करून ती योजना शासनाकडून मंजूर करून घेईन व पतसंस्थांच्या कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना ईएसआय सारख्या योजनांचा लाभ मिळवून देणार आहोत असे सांगितले.”
कोल्हापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शंकर पाटील यांनी जिल्हा फेडरेशनच्या कार्याचा आढावा घेत प्रशिक्षण केंद्र मंजूर करणे, नाममात्र सभासदांशी व्यवहार करण्याची परवानगी देणे आणि अंशदान रद्द करणे या मागण्या केल्या व आरोग्य मंत्री यांनी नेहमीच पतसंस्थांच्या प्रश्नांवर शासनाकडे ठाम आवाज उठविला आहे. पतसंस्थांच्या ठेवीला डिआयजिसी मार्फत बँकांप्रमाणे विमा संरक्षण मिळावे व जाचक असणाऱ्या कायद्यात बदल व्हावेत यासाठी शासनाकडे प्रयत्न करावेत, असे सांगून कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन हे नेहमी पतसंस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच सभासदांच्या शंकांचे निरसन केले.
याप्रसंगी जिल्हा फेडरेशनच्या सहकारी पतसंस्था चळवळीतील मच्छिंद्र मुरुडकर, सुनील नांगावकर, प्रफुल्ल यादव, आदिनाथ किणींगे, सुधाकर पिसे, हाजगुळकर यांनी मनोगत व्यक्त करून कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या कार्याचे कौतुक केले.
याप्रसंगी गजानन नागरी पतसंस्था गडहिंग्लज, कल्पद्रुम पतसंस्था हसुर, हनुमान पतसंस्था कुरूकली, पोलिस डिस्ट्रिक्ट सोसायटीचे मुख्य अधिकारी भगवान पाटील, प्रफुल्ल यादव यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच कायदेशीर सल्लागार व मार्गदर्शक म्हणून मच्छिंद्र मुरुडकर व पतसंस्थांना उपयुक्त विविध धोरणे पुस्तकाचे लेखक चार्टर्ड अकौंटंट सुनील नांगावकर यांचाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मानद संचालकपदी फेडरेशनचे कार्याध्यक्ष अनिल पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कार्याध्यक्ष अनिल पाटील यांनी केले, विषयपत्रिका वाचन व्यवस्थापक दीपक पाटील यांनी केले. उपाध्यक्ष मोहनलाल माळी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मधुकर पाटील यांनी केले. कार्यक्रमास प्रियदर्शनी महिला पतसंस्था इचलकरंजीच्या अध्यक्षा किशोरी आवाडे, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक शिवाजी पाटीलदादा, जिल्हा फेडरेशनचे बाळासाहेब पाटील व सर्व संचालक,सेवक, वसुली अधिकारी यांच्यासह विविध पतसंस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.