

नांदेड : धनसंपदा महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., नांदेडची ९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी आशीर्वाद गार्डनजवळील अंबिका मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली. सभेला संस्थेच्या ११ शाखांमधील सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सभेची सुरुवात संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या विविध शाखांमधून उपस्थित झालेल्या सभासदांचे कार्यकारी संचालक श्री. रमेश राठोड यांच्या वतीने शाखानिहाय स्वागत व सत्कार करण्यात आला.
संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री. राजेश मुट्टेपवार यांनी सभेची प्रस्तावना मांडून उपस्थित सभासदांचे स्वागत केले. यावेळी काही सभासदांनी संस्थेबद्दलच्या भावना व्यक्त करत संस्थेच्या कार्याबाबत समाधान व कृतज्ञता व्यक्त केली.
संस्थेच्या सचिव सौ. निता माळी यांनी सभेची विषयपत्रिका सभासदांसमोर मांडली. तसेच संस्थेवर सभासदांनी आजवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. आगामी काळातील संस्थेची वाटचाल, नियोजन आणि उद्दिष्टांची माहितीही त्यांनी दिली.
यानंतर सर्व शाखाधिकाऱ्यांनी उपस्थितांना आपला परिचय करून दिला. कार्यकारी संचालक श्री. रमेश राठोड यांनी संस्थेच्या आजवरच्या संघर्षमय प्रवासाचा आढावा घेत संस्थेची प्रगती, भविष्यातील योजना आणि उद्दिष्टांबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाला सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संस्थेच्या अध्यक्षा मा. निरुपा राठोड यांनी अध्यक्षीय भाषणातून विविध विषयांवर सभासदांशी संवाद साधला. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सभासदांचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
सभेच्या शेवटी लेखापरीक्षण अधिकारी श्री. कैलास खंडारे यांनी आभारप्रदर्शन केले. त्यानंतर ९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता करण्यात आली.