

दापोली : दापोली अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने भागधारक सभासद आणि ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ग्राहकहितदक्ष निर्णय घेतला आहे. बँकेच्या ग्राहकांनी संस्थेवर दाखवलेला दृढ विश्वास आणि बँकेची होत असलेली दैदिप्यमान घोडदौड विचारात घेऊन, संचालक मंडळाने सभासद व ठेवीदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत त्यांच्या अपघात विमा संरक्षणाच्या रक्कमेत मोठी वाढ केली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगांवकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पूर्वी बँकेत १ हजार रुपयांचे शेअर्स धारण केलेल्या भागधारक सभासदाचा २ लाख रुपयांचा अपघात विमा उतरवला जात असे, या मर्यादेत आता वाढ करून ती ३ लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच, ज्या ठेवीदारांच्या बँकेत ५० हजार रुपये किंवा त्याहून अधिकच्या ठेवी आहेत, अशा ठेवीदारांसाठी पूर्वी ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण होते; त्यात वाढ करून ती मर्यादा आता ७ लाख रुपये करण्यात आली आहे.
या नवीन निर्णयामुळे ज्या व्यक्ती बँकेच्या सभासद असण्यासोबतच ५० हजारांपेक्षा जास्त ठेवीदारही आहेत, अशा प्रत्येक घटकाला बँकेमार्फत एकूण १० लाख रुपयांचे संयुक्त अपघात विमा संरक्षण मिळून त्यांचे कुटुंब पूर्णपणे सुरक्षित होणार आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष जयवंत जालगांवकर म्हणाले की, या नवीन योजनेच्या अंमलबजावणीमुळे बँकेवर दरवर्षी ३५ ते ४० लाख रुपयांचा अतिरिक्त विमा हप्त्याचा (प्रीमियम) बोजा पडणार आहे. परंतु, नफ्यापेक्षा भागधारक सभासद व ठेवीदारांचे हित जपण्याला संचालक मंडळाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतूनच संचालक मंडळाने हा धाडसी निर्णय घेतला असून, या योजनेमुळे भविष्यात संकटात सापडणाऱ्या अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांची होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी बँकेने विशेष पुढाकार घेतला आहे. सध्या बनावट मेसेज, फिशिंग ई-मेल्स, तसेच व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी प्रलोभने दाखवून, ओटीपी (OTP) नंबर मागून किंवा धार्मिक भावनांचा गैरफायदा घेऊन जनतेची आर्थिक लूट करण्याचे प्रकार वाढले आहेत.
या सायबर फ्रॉडच्या चक्रातून सामान्य जनतेचे रक्षण व्हावे आणि त्यांची होणारी फसवणूक टळावी यासाठी बँक जनजागृती मोहीम राबवणार आहे. यासाठी बँकेमार्फत मार्गदर्शक सूचना असणाऱ्या माहितीपत्रकांचे वाटप जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळे, जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये केले जाणार आहे.
या पत्रकार परिषदेला बँकेचे ज्येष्ठ संचालक माधव शेट्ये, संचालक सी.ए. संदीप खोचरे, आशिष मेहता, अशोक जाधव तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी थोरात प्रमुख उपस्थित होते. बँकेने घेतलेल्या या सुरक्षा कवच वाढीच्या निर्णयाचे आणि सामाजिक जनजागृतीच्या उपक्रमाचे दापोली शहर व परिसरातून जोरदार स्वागत होत आहे.