
पुणे: येथील कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने उमुंथू सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने भारतातील पहिले युवा-केंद्रित डिजिटल बँकिंग ॲप ‘कॉस्मो गलगल’ कार्यान्वित केले आहे. सहकारी बँक आणि फिनटेक क्षेत्रांमधील एका ऐतिहासिक करार-सहकार्यातून हा उपक्रम साकारला असून सहकारी बँकिंग क्षेत्रात एक नवा टप्पा ठरला आहे. याकडे पारंपरिक विश्वास आणि आधुनिक डिजिटल नवोपक्रम यांचा अनोखा संगम म्हणून पाहिले जात आहे.
विशेषतः जनरेशन झेड आणि मिलेनियल्ससाठी (तरुण पिढीसाठी) कॉस्मो गलगल हे ॲप डिझाइन केलेले आहे. हे ॲप पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस बँकिंगचा अनुभव देणार आहे. वापरकर्ते याचा सुरक्षित व्हिडिओ केवायसीच्या माध्यमातून शाखेत न जाता केवळ १५ मिनिटांत शून्य-बॅलन्स बचत खाते उघडू शकतात. या ॲपद्वारे बचत खाती, निधी हस्तांतरण, मुदत ठेवी, ठेवींची माहिती आणि व्यवहारांचे स्टेटमेंट अशा सर्व सेवा एका आकर्षक डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत.
कॉस्मो गलगल हे पूर्णपणे UPI-सक्षम ॲप आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या कॉसमॉस बँक खात्यांना इतर कोणत्याही UPI ॲपशी सहजपणे लिंक करता येते आणि खाते व्यवस्थापन करणे अधिक सोयीस्कर होते. याशिवाय, या ॲपमधील ‘ट्रेंडझेड डॅशबोर्ड’(आर्थिक सवयी दाखवणारे नियंत्रण फलक) हे वैशिष्ट्य विशेष लक्षवेधी आहे. हे डॅशबोर्ड वापरकर्त्यांच्या खर्चाचे स्वयंचलित वर्गीकरण करून रिअल-टाइम विश्लेषण व आर्थिक अंतर्दृष्टी प्रदान करते.
ॲपमधील ‘ऑटो-बजेटिंग टूल’ हे आणखी एक उपयुक्त वैशिष्ट्य आहे. हे साधन वापरकर्त्यांना त्यांचा खर्च आवश्यक गोष्टी, बचत आणि ऐच्छिक खर्च या वर्गांमध्ये विभागून त्यांचे आर्थिक नियोजन अधिक चांगले करण्यास मदत करते. तसेच वापरकर्त्यांना त्वरित व्हर्च्युअल डेबिट कार्ड जारी केले जाते, तर इच्छेनुसार ते प्लॅटिनम फिजिकल कार्डचीही मागणी करू शकतात. या प्लॅटिनम कार्डसोबत विशेष बक्षिसे आणि सवलतीही मिळणार आहेत.
आपल्याकडील भाषिक विविधतेचा विचार करून, "कॉस्मो गलगल" इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती या भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. पुढील काळात आणखी प्रादेशिक भाषांमध्येही हे ॲप उपलब्ध होणार असून त्यामुळे देशभरातील तरुण वापरकर्त्यांसाठी हे अधिक सुलभ आणि समावेशक ठरणार आहे.
उमुंथूचे मुख्य विपणन अधिकारी दर्शन देसाई यांनी म्हटले की, “गलगल हे केवळ एक बँकिंग ॲप नसून तरुण भारतीयांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर अधिक नियंत्रण आणि स्पष्टता मिळवून देणारा एक ‘फायनान्शियल साथीदार’ आहे.” त्यांनी हे ॲप डिजिटल युगातील तरुणांसाठी आर्थिक साक्षरतेचे आणि जबाबदारीचे प्रतीक असल्याचेही नमूद केले.
कॉसमॉस बँकेच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आरती ढोले यांनी या उपक्रमाला बँकेच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासातील एक ऐतिहासिक पाऊल म्हटले आहे. “सुरक्षित तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित डिझाइन यांच्या सहयोगातून कॉस्मो गलगल तयार झाले आहे. हे डिजिटल युगात आमच्या दीर्घकालीन विश्वासाला नवे रूप देते आहे.” असे त्यांनी सांगितले.
उमुंथू सिस्टम्सचे सीईओ हर्ष छत्रपती यांनी सांगितले की, “देशभरातील १,५०० हून अधिक सहकारी बँका डिजिटल संक्रमणाच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. अशा वेळी ‘गलगल’ हे सहकारी बँकिंगची भावना कायम ठेवत आधुनिकतेचा उत्तम नमुना ठरू शकते.”
कॉसमॉस बँक ११९ वर्षांच्या परंपरेसह आणि सात राज्यांमधील २० लाखांहून अधिक ग्राहकांसह नैतिकता आणि ग्राहककेंद्री कार्यासाठी ओळखली जाणारी आघाडीची सहकारी बँक आहे. आता ‘कॉस्मो गलगल’च्या लाँचमुळे बँकेचा हा वारसा डिजिटल माध्यमातून तरुण आणि भारताच्या गरजांशी जोडला गेला आहे.
कॉसमॉस बँक आणि उमुंथू सिस्टम्स यांच्यातील ही भागीदारी सहकारी बँकिंग आणि फिनटेक नवोपक्रम यांच्या संयोगाचा एक निर्णायक क्षण ठरत आहे, जो भारतातील सहकारी बँकिंगच्या नव्या युगाची सुरुवात करतो.