२० हजारांपेक्षा जास्त रोखीचा व्यवहार पडणार महागात!

आयकर विभागाचा नवा नियम तुम्ही वाचलात का?
पैशांच्या देण्या-घेण्याचा व्यवहार
पैशांच्या देण्या-घेण्याचा व्यवहार
Published on

पैशांच्या देण्या-घेण्याचा व्यवहार रोखीने करणाऱ्यांनी आता आयकर विभागाच्या नव्या नियमाची दखल घेतलीच पाहिजे. जर कुणी कर्ज देण्यासाठी किंवा घेण्यासाठी रकमेचा वापर करत असाल, तर आता त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की, जर कोणी २० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेतली किंवा दिली तर तो कायदा मोडल्याचा गुन्हा ठरणार आहे. जर कोणी २० हजारपेक्षा जास्त रक्कम दिली किंवा घेतली तर त्या रकमेइतकाच दंड आकारला जाणार आहे. सरकारला असा विश्वास आहे की, मोठ्या प्रमाणात रोख व्यवहारांमुळे काळा पैसा आणि करचुकवेगिरीची प्रकरणे वाढतात. त्यामुळे आता हे थांबवणे अत्यावश्यक आहे.

जर तुम्ही तुमच्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला २०,००० रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम उधार दिली असेल किंवा घेतली असेल तर ते कायद्याविरुद्ध ठरणार आहे. आयकर नियमांनुसार, २०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार रोखीने करता येत नाही, मग ते कर्ज असो किंवा इतर कोणत्याही कारणास्तव. जर तुम्ही असे केले तर आयकर विभाग ते गांभीर्याने घेऊ शकतो. यासाठी,

आयकर कायद्याचे कलम २६९एसएस लागू होते आणि या अंतर्गत कलम २७१डी

अंतर्गत रोखीने घेतलेल्या किंवा दिलेल्या रकमेइतका दंड तुमच्यावर आकारला जाऊ शकतो. म्हणजेच जर तुम्ही २५,००० रुपये रोखीने घेतले तर तुम्हाला २५,००० रुपये इतकाच दंडही भरावा लागू शकतो.

सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत कडक निर्णय दिलेला आहे.

एप्रिल २०२५ मध्ये न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, जर कोणी दोन लाखांपेक्षा जास्त व्यवहार रोखीने केले तर आयकर विभाग त्याची चौकशी करेल. न्यायालयाने असेही म्हटले आहे की, ज्या व्यक्तीने रोख स्वरूपात हे पैसे दिले आहेत त्याला हे पैसे कुठून आले हे देखील सांगावे लागेल.

आता तुम्हाला प्रश्न पडेल की, हे नियम सर्वांना लागू होतात का? तर त्याचे उत्तर नाही हे आहे. जर व्यवहार बँक, सरकारी संस्था किंवा सरकारच्या कोणत्याही विभागासोबत होत असेल तर हे नियम लागू होत नाहीत. याशिवाय, जर व्यवहार करणारे दोघेही शेतीशी संबंधित असतील आणि दोघांचेही उत्पन्न कर कक्षेत येत नसेल तर हे नियम त्यांना देखील लागू होत नाहीत.

जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार देत असाल किंवा कर्ज देत असाल आणि रक्कम २० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर हा व्यवहार बँकेतून करण्याचा प्रयत्न करा. आजच्या काळात ऑनलाइन व्यवहार करणे खूप सोपे झालेले आहे. अशा परिस्थितीत, चुकूनही मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार करणे टाळा. अन्यथा नंतर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते आणि व्यवहार रकमेइतका दंड देखील आकारला जाऊ शकतो.

Banco News
www.banco.news