
आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी लोक इमानेइतबारे कष्ट करीत असतात. पण, बहुतांश लोकांत कुठेतरी झटपट श्रीमंत होण्याची आशा असतेच. प्राथमिक शाळेतही तुम्हाला १ कोटी रुपयाची लॉटरी लागली तर..काय कराल ?, असा निबंध परीक्षेत हमखास लिहिलेला असतोच. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच बहुतेकांचे हे स्वप्न असतेच. वर्तमानपत्रातही एखाद्या सामान्य कष्टकऱ्याला मोठी लॉटरी लागल्याची बातमी वाचनात येते आणि त्याच्याबद्दल असूया वाटू लागते. मोठी लॉटरी लागावी म्हणून लॉटरीच्या तिकिटांवर हजारो रुपये खर्चणारे कोट्यवधी लोक आहेत. त्यामुळे अशी एखादी लॉटरी लागण्याची लोक वाटच पाहत असतात. त्याचाच हे स्कॅमर गैरफायदा घेतात पण अशा स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी नेहमीच खोट्या असतात, हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे.लॉटरी फसवणूक म्हणजे अशी फसवणूक करणारे स्कॅमर लोकांना तुम्हाला बक्षीस मिळाल्याची खोटी माहिती देऊन काही पैसे पाठवायला किंवा वैयक्तिक माहिती शेअर करायला भाग पाडतात. म्हणून अशी फसवणूक होऊ नये यासाठी पुढील गोष्टी ध्यानात घ्या.
करावयाच्या गोष्टी (Dos):
फी भरू नका: फसवणूक करणारे खोट्या बक्षिसासाठी कर, शिपिंग शुल्क(वाहतूक खर्च) किंवा इतर शुल्क मागतात. अशा कोणत्याही लॉटरीसाठी आगाऊ पैसे पाठवू नका.
अकस्मात दावे तपासा: अचानक आलेल्या "तुम्ही लॉटरी जिंकल्याच्या" संदेशांवर किंवा फोन कॉलवर विश्वास ठेवू नका. त्यांच्या दाव्याची पडताळणी करा.
फसवणुकीची तक्रार करा: जर तुम्हाला लॉटरीमध्ये फसवणुकीचा संशय वाटत असेल, तर तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवा.
सावध राहा: लक्षात ठेवा — कोणीही विनामूल्य मोठ्या रकमेचे बक्षीस देत नाही.
आपल्या घामाचा दामच खरा; बक्षीस, लॉटरीचा सोस नव्हे बरा! हे मनावर कोरून ठेवा.
अशा गोष्टी करू नयेत (Don'ts):
आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका: कोणत्याही लॉटरी क्लेमसाठी वैयक्तिक किंवा बँक संबंधित कोणतीही माहिती देऊ नका.
नकली अधिकाऱ्यांपासून सावध रहा: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कोणतेही सार्वजनिक खाते चालवत नाही, ठेवी मागत नाही किंवा वैयक्तिक माहिती विचारत नाही.
खोटे संदेश दुर्लक्षित करा: बक्षीस, सरकारी मदत किंवा KYC अपडेटच्या नावाखाली आलेल्या संदेशांना अजिबात प्रतिसाद देऊ नका.