बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप स्थगित

रात्री उशिरा IBA- UFBU बैठक; २८ ते ३० सप्टेंबरचा नियोजित संप मागे
बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप स्थगित
बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप स्थगित
Published on: 

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेला तीन दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे. संप सुरू होण्याच्या काही तास आधी भारतीय बँक संघटना (IBA) आणि बँक कर्मचारी संघटनांची संयुक्त संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीनंतर संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, संप स्थगित करण्यात आला असला तरी कर्मचारी संघटना आणि बँक व्यवस्थापनामध्ये सर्व मागण्यांवर अंतिम तोडगा निघाला आहे की नाही, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

२८ ते ३० सप्टेंबरदरम्यान होणार होता संप

UFBUने २८, २९ आणि ३० सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांसाठी देशव्यापी बँक संपाची घोषणा केली होती. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटनांनी हा आंदोलनाचा निर्णय घेतला होता. मात्र, संपाच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीनंतर तो स्थगित करण्यात आला.

त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, नियोजित संपामुळे प्रभावित होऊ शकणाऱ्या बँकिंग सेवांवरील संभाव्य परिणाम सध्या टळला आहे.

पाच दिवसांचा कामाचा आठवडा ही प्रमुख मागणी

बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्याचा मुद्दा आहे. याशिवाय पेन्शन लाभांमध्ये सुधारणा, सर्व पेन्शनधारकांसाठी समान महागाई भत्ता धोरण आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत परतण्याचा पर्याय देण्याच्या मागण्यांचाही समावेश आहे.

कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्याबाबत सरकारकडून ठोस आश्वासन मिळालेले नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला होता.

रविवारीही सुरू ठेवण्यात आले होते बँकांचे कामकाज

संपामुळे सलग अनेक दिवस बँकिंग सेवा बंद राहू नयेत आणि ग्राहकांची गैरसोय कमी व्हावी, यासाठी रविवारी बँकांचे कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. चौथा शनिवार असल्याने शनिवारची सुट्टी होती. त्यानंतर रविवार आणि नियोजित तीन दिवसांचा संप यामुळे बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता होती.

संप स्थगित झाल्याने चेक क्लिअरन्स, रोख रक्कम जमा-काढणे आणि इतर बँकिंग सेवांबाबत ग्राहकांना होणारी संभाव्य गैरसोय टळली आहे.

सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांवर परिणाम होण्याची शक्यता

संप झाला असता त्याचा परिणाम सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जुन्या खासगी क्षेत्रातील बँका तसेच प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजावर होण्याची शक्यता होती. मात्र, सध्या संप स्थगित करण्यात आल्याने या सेवांवरील नियोजित व्यत्यय टळला आहे.

पुढील चर्चेकडे लक्ष:- बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सरकार, बँक व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनांमध्ये पुढील काळात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संप स्थगित झाला असला तरी पाच दिवसांचा कामाचा आठवडा आणि इतर प्रलंबित मागण्यांवर पुढे काय निर्णय होतो, याकडे बँक कर्मचारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
Attachment
PDF
UNDERSTANDINGS REACHED WITH IBA OUR STRIKE ACTION AND AGITATION DEFERRED
Preview
Banco News
www.banco.news