बँक कर्मचारी संपावर; २७ जानेवारीला देशव्यापी आंदोलन

चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार आणि कर्ज सेवांवर परिणाम होण्याची भीती
 देशव्यापी आंदोलन
देशव्यापी आंदोलन
Published on

नवी दिल्ली:
बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. बँकांसाठी ‘पाच दिवसांचा आठवडा’ लागू करावा, ही या संपामागील प्रमुख मागणी आहे. संप यशस्वी ठरल्यास सलग तीन दिवस बँकांचे कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे.

जानेवारी महिन्यात २५ जानेवारी (रविवार) आणि २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) या सार्वजनिक सुट्ट्या आधीच असल्याने, त्यानंतर लगेचच २७ जानेवारीला संप झाल्यास बँकांचे व्यवहार सलग तीन दिवस बंद राहू शकतात. यामुळे चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार, कर्ज व्यवहार, ड्राफ्ट, पासबुक अपडेट यांसारख्या महत्त्वाच्या वित्तीय सेवांवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काय आहेत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

सध्या बँक कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी मिळते. मात्र, उर्वरित पहिला व तिसरा शनिवारही सुटी म्हणून घोषित करावा, अशी मागणी कर्मचारी संघटना अनेक दिवसांपासून करत आहेत. यामुळे बँकांसाठी पाच दिवसांचा कार्यआठवडा लागू होईल.

करार असूनही निर्णय प्रलंबित

मार्च २०२४ मध्ये झालेल्या वेतन कराराच्या वेळी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि UFBU यांच्यात या मागणीवर तत्त्वतः सहमती झाली होती. मात्र, त्यानंतरही केंद्र सरकारकडून अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही, असा आरोप संघटनांकडून केला जात आहे.

ग्राहकांवर परिणाम

जर संप मागे घेतला गेला नाही, तर सामान्य ग्राहक, व्यापारी, उद्योग आणि सरकारी व्यवहारांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक बँक ग्राहकांनी महत्त्वाचे व्यवहार आधीच पूर्ण करण्याचे आवाहन बँकिंग तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, सरकार आणि बँक कर्मचारी संघटनांमध्ये लवकरच तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Banco News
www.banco.news