
मुंबई : ग्राहकांच्या ठेवीं बाबतची सायबर फसवणूक रोखण्यासाठी ॲक्सिस बँकेने नुकतीच ‘Lock FD’ ही एक नवीन सुरक्षा सुविधा लाँच केली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवरून त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सचे खाते अकाली बंद करता येईल.एफडी खाते बंद करण्यासाठी त्यांना आता शाखेला प्रत्यक्ष भेट देणे बँकेने बंधनकारक केलेले आहे.
ही सुविधा मोबाईल ॲप किंवा बँकेच्या कोणत्याही शाखेस भेट देऊन सुरू करता येते. एकदा ‘Lock FD’ सक्रिय झाल्यानंतर ठेवधारकाला त्यावर कर्ज घेता येणार नाही तसेच वेळेआधी (परिपक्व तारखे आधी ) एफडी बंद करावयाची असल्यास इंटरनेट किंवा मोबाईल बँकिंगद्वारे एफडी बंद करता येणार नाही, ग्राहकाला त्यासाठी शाखेत जाऊन ओळख पडताळणी पूर्ण करावी लागेल.
फसवणूक करणाऱ्यांकडून चोरी झालेली क्रेडेन्शियल्स किंवा SIM swap तंत्राच्या माध्यमातून होणाऱ्या धोक्यापासून ही सुविधा ग्राहकांना संरक्षण देते. अलीकडील अनेक प्रकरणांमध्ये एफडी खाते अकाली बंद करून डिजिटल मार्गाने पैसे चोरण्यात आले होते. त्यामुळे ही नवी सुविधा ज्येष्ठ नागरिक व इतर संवेदनशील गटासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकते.
ॲक्सिस बँकेचे डिजिटल बिझनेस, ट्रान्सफॉर्मेशन व स्ट्रॅटेजिक प्रोग्रॅम्सचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह समीर शेट्टी यांनी सांगितले, "ही सुविधा ग्राहकांना त्यांच्या टर्म डिपॉझिट्सवरील अनधिकृत डिजिटल प्रवेशापासून सुरक्षित ठेवते आणि फसवणुकीद्वारे निधी हडपण्याचे पर्यायी मार्ग बंद करते."
बँकेने यापूर्वी SMS द्वारे येणाऱ्या OTP च्या फसवणुकीपासून संरक्षण करणारी ‘In-App Mobile OTP’ ही सुविधा सादर केली आहे. ‘Lock FD’ ही सुविधा ॲक्सिस बँकेच्या सायबर सुरक्षेच्या धोरणातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
*बँको न्यूज: अशा सुविधा आपल्या ग्राहकांना देण्यासाठी सहकारी बँकांनी पुढाकार घ्यावा. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतीलच शिवाय सायबर गुन्हेगारीला काहीअंशी नक्कीच रोखता येईल.