

नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च सहकारी संस्था असलेल्या 'नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया'च्या (NCUI) संचालक मंडळाच्या निवडणुकीत चिक्कोडीचे माजी खासदार तथा बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (BDCC) बँकेचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब जोल्ले यांनी बाजी मारली आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी श्री. संजीव कुशाळकर यांचा १५-० असा धुव्वा उडवत दणदणीत विजय नोंदवला. या एकतर्फी विजयामुळे राष्ट्रीय सहकार वर्तुळात जोल्ले यांच्या नेतृत्वाचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.
गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळापासून सहकार क्षेत्रात निष्ठापूर्वक कार्यरत असणाऱ्या अण्णासाहेब जोल्ले यांच्या दीर्घ अनुभवाला आणि उल्लेखनीय योगदानाला मिळालेली ही राष्ट्रीय पातळीवरील मान्यता मानली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सध्या देशात सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि आधुनिक बनवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवरील ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. भारतीय जनता पक्ष आणि सहकार भारतीने अनुभवी व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाला NCUI मध्ये संधी देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता.
या ऐतिहासिक विजयासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, संरक्षक डी. एन. ठाकूर, नाफेडचे संचालक अशोक ठाकूर आणि निवडणूक प्रभारी कुलदीप चाहेल यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.
विजयानंतर भावना व्यक्त करताना श्री. अण्णासाहेब जोल्ले यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.
"सहकारी संस्थांचे सक्षमीकरण, कामकाजातील पारदर्शकता, शेतकरी आणि ग्रामीण भागातील घटकांना स्वावलंबी बनवणे हे माझे मुख्य ध्येय आहे. केंद्र सरकारच्या 'सहकार से समृद्धी' या संकल्पाला प्रत्यक्ष आकार देण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अण्णासाहेब जोल्ले यांच्या निवडीमुळे राष्ट्रीय सहकार चळवळीला नवसंजीवनी मिळेल, असा सूर तज्ज्ञांमधून उमटत आहे. NCUI च्या माध्यमातून नवकल्पना (Innovations), सुशासन (Good Governance), पारदर्शकता आणि शाश्वत विकासाला येत्या काळात अधिक वेग मिळेल, अशी अपेक्षा सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केली आहे.