अमरावतीत बँकेला तोतयाचा फोन; २५ लाखांची फसवणूक

खातेदाराचा आवाज आणि बनावट लेटरहेड वापरून रचलेली फसवणूक
Bank Fraud News
अमरावतीत बँकेला तोतयाचा फोन; २५ लाखांची फसवणूक
Published on

अमरावती : सायबर भामटे दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणुकीचे नवनवे मार्ग शोधत आहेत. ऑनलाईन फसवणूक, नोकरी किंवा लॉटरीचे आमिष, बँक तपशील मिळवणे अशा अनेक प्रकारांतून नागरिकांना गंडा घालणाऱ्या या टोळ्यांनी आता थेट बँक कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अमरावतीत अशाच एका गंभीर प्रकरणात नामांकित कंपनीच्या खातेदाराचा आवाज आणि बनावट लेटरहेड वापरून तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. मात्र, सायबर पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे यातील १९ लाख रुपये परत मिळवण्यात यश आले आहे.

अमरावती येथील एका बँकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण संबंधित बँकेचा करंट अकाऊंट धारक असल्याचे भासवले. खातेदाराचा आवाज हुबेहूब नक्कल करून तसेच व्यावसायिक पद्धतीने संवाद साधत, सुरूवातीला त्याने २ कोटी रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्याचे आमिष दाखवले. मोठ्या गुंतवणुकीच्या प्रस्तावामुळे बँक कर्मचाऱ्याचा विश्वास बसला.

यानंतर काही वेळाने पुन्हा फोन करून भामट्याने, “माझे चेकबुक संपले आहे आणि मला तातडीने एका खात्यावर पैसे पाठवायचे आहेत,” असे सांगितले. विश्वास वाढवण्यासाठी त्याने कंपनीच्या बनावट लेटरहेडवर खाते क्रमांक व व्यवहाराची माहिती पाठवत, २४ लाख ९८ हजार रुपये तातडीने आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करण्याची विनंती केली. संबंधित खातेदार हा बँकेचा जुना आणि विश्वासू ग्राहक असल्याने कोणताही संशय न येता कर्मचाऱ्याने रक्कम हस्तांतरित केली.

Bank Fraud News
Aadhaar Card Fraud: एका चुकीमुळे खात्यातील पैसे गायब, जाणून घ्या सुरक्षित उपाय

फसवणूक उघडकीस कशी आली?

काही वेळानंतर मूळ खातेदाराने थेट बँक मॅनेजरला फोन करून आपल्या खात्यातून २४ लाख ९८ हजार रुपये वजा झाल्याचे, मात्र आपण असा कोणताही व्यवहार केला नसल्याचे सांगितले. यानंतर बँकेने तातडीने खातेदाराच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाची पडताळणी केली. तपासात ज्या क्रमांकावरून फोन आला होता, तो क्रमांक खातेदाराचा नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित बँक कर्मचाऱ्याने तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सायबर पोलिसांची तत्पर कारवाई

तक्रार मिळताच सायबर पोलिसांनी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तातडीने गुन्ह्याची नोंद केली. तांत्रिक तपास करताना फसवणूक झालेली रक्कम ज्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली होती, त्या बँकेशी तात्काळ पत्रव्यवहार करून संबंधित खाते गोठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पोलिसांच्या जलद हालचालीमुळे फसवणुकीपैकी १९ लाख रुपये गोठवण्यात यश आले.

सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही रक्कम मूळ खातेदाराच्या खात्यात यशस्वीरीत्या परत करण्यात आली आहे. उर्वरित रकमेचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून, आरोपींच्या टोळीपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक विश्लेषण केले जात आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार, प्रियंका कोटावार आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

Bank Fraud News
Bank Fraud: बँक खातेधारकांनो फेक बँकिंग ॲप सावधान!

नागरिक व बँकांसाठी इशारा

या घटनेमुळे सायबर भामटे किती योजनाबद्ध आणि प्रगत पद्धतीने फसवणूक करत आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. फोनवरून येणाऱ्या कोणत्याही आर्थिक विनंत्यांची खातरजमा, नोंदणीकृत क्रमांकाची पडताळणी आणि अंतर्गत प्रक्रियांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांसह बँक कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Banco News
www.banco.news