
बँका व वित्तीय संस्थांच्या प्रशासनावर गंभीर भाष्य करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर जे. स्वामिनाथन यांनी, काही व्यवस्थापनांमध्ये सर्जनशील लेखांकन, नियमनांचे सोयीस्कर अर्थ लावणे, बँकेची नियमावली काटेकोर नसणे व अपुरे अंतर्गत नियंत्रण या पद्धतींचा शिरकाव होत असल्याबद्दल खबरदारीचा इशारा दिलेला आहे.
स्वामिनाथन म्हणाले की, "स्पर्धात्मक दबावाच्या नावाखाली काही बँका व एनबीएफसी अल्पकालीन यशाच्या मागे लागून अनैतिक पद्धती अंगीकारत आहेत. यामुळे पर्यवेक्षी हस्तक्षेप आवश्यक बनतो आहे."
त्यांनी स्पष्ट केले की, जरी अशा घटना मर्यादित असल्या, तरी त्यामुळे बँकिंग व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होण्याचा धोका निर्माण होतो आहे.
प्रशासनाचे तीन गंभीर दोष – लेखांकन, धोरणे आणि नियंत्रणे
स्वामिनाथन यांनी निर्देशित केलेल्या अशा संस्थांमध्ये दिसणाऱ्या प्रमुख त्रुटींमध्ये:
१) सर्जनशील लेखांकन (Creative Accounting):
ज्यामध्ये बँका किंवा वित्तीय संस्था कायद्याच्या मर्यादेत राहून, पण हेतुपुरस्सर, आर्थिक आकड्यांचे (उदा. नफा, कर्जवाटप, भांडवल) सादरीकरण अधिक चांगले दिसावे यासाठी वेगळ्या प्रकारे मांडणी करतात.
उदाहरणार्थ : एखादी बँक नफा जास्त दाखवण्यासाठी खर्च पुढील तिमाहीत टाकते किंवा नुकसान लपवण्यासाठी आकड्यांचे वर्गीकरण बदलते.
२) नियामक संकल्पनांचा सोयीस्कर अर्थ लावणे :
यामध्ये रिझर्व्ह बँकेसारख्या नियामक संस्थांनी ठरवलेल्या नियमांचा जशास तसा अर्थ न घेता, बँका त्याचा आपल्याला फायदेशीर असा (लवचिक, सैल) अर्थ लावतात.
उदाहरणार्थ : कर्जवाटपासाठीचे काही निकष सौम्यपणे घेतले जातात आणि नियम मोडत नाही असं दाखवून धोका असलेल्यांना कर्ज दिलं जातं.
3. अंतर्गत नियंत्रणे आणि प्रक्रियांतील कमकुवतपणा:
यामध्ये बँकेच्या अंतर्गत कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी असलेल्या यंत्रणा (जसे ऑडिट, रिपोर्टिंग सिस्टीम, ड्युटी सेग्रेगेशन (कामांची व जबाबदाऱ्यांची विभागणी)) अव्यवस्थित किंवा अपुरी असणे. यामुळे झालेले गैरव्यवहार किंवा चुका वेळेवर लक्षात येत नाहीत.
उदाहरणार्थ : बँकेच्या शाखेत मोठ्या रकमेचे कर्ज एका व्यक्तीच्या सल्ल्यानुसार मंजूर होते, पण त्यावर स्वतंत्र नियंत्रण किंवा पुनरावलोकन नसते.
या गंभीर त्रुटी बँकिंग संस्थेमध्ये पारदर्शकतेचा अभाव, जोखीम वाढ, आणि सार्वजनिक विश्वास कमी होण्याचा धोका निर्माण करतात – म्हणूनच RBI या बाबतीत गंभीर असल्याचे नमूद करून स्वामिनाथन यांनी बँक व्यवस्थापनांना इशारा देत सांगितले आहे की, "उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी कोणत्याही साधनाचा वापर योग्य मानणे ही प्रवृत्ती अत्यंत धोकादायक आहे."
बँकांसाठी केवळ आर्थिक भांडवल नव्हे, तर विश्वास आणि प्रतिष्ठाही महत्त्वाची:
बँकिंग क्षेत्रात संसाधने म्हणजे केवळ भांडवल नव्हे, तर लोक, प्रणाली, संस्थात्मक स्मृती, ग्राहकांचा विश्वास आणि प्रतिष्ठा देखील तितकीच महत्त्वाची आहेत, असे स्वामिनाथन यांनी सांगितले. "प्रत्येक रुपयामध्ये केवळ व्याज नव्हे, तर उद्दिष्टही असले पाहिजे. दीर्घकालीन गुंतवणूक, पारदर्शकता आणि समावेशक कर्जपुरवठा यांना प्रोत्साहन देणारी भूमिका बँकांनी स्वीकारली पाहिजे," असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
उच्च व्यवस्थापना पासून शाखेपर्यंत नैतिकता आवश्यक:
स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले की, धोरणांचे मूल्य फक्त कागदावर न राहता त्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये दिसले पाहिजे.
"व्यवस्थापनाने बनवलेले निर्णय शाखास्तरावर प्रत्यक्षात उतरले पाहिजेत. धोरणांची अंमलबजावणी करणे म्हणजेच खऱ्या बदलाची सुरुवात आहे," असे ते म्हणाले.
बँकिंग क्षेत्रासाठी पुढील मार्ग – जबाबदारी आणि पारदर्शकता:
स्पर्धेच्या आणि डिजिटल युगाच्या वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी व बँकिंगच्या भविष्यासाठी बँकांनी संस्थात्मक मूल्ये, मजबूत अंतर्गत संस्कृती आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन स्वीकारणे हेच निर्णायक ठरेल, असा संदेश स्वामिनाथन यांनी यातून दिलेला आहे.