

एआय हल्ले आणि रिझर्व्ह बँकेचा इशारा
सध्या सायबर गुन्हेगार 'AI एजंट्स' आणि ऑटोमेटेड टूल्सचा वापर करून बँकांच्या पेमेंट प्रणालीमध्ये अत्यंत वेगाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या अलीकडील अहवालानुसार, आगामी काळात वित्तीय संस्थांसमोर एआय-सक्षम सायबर हल्ले हेच सर्वात मोठे आव्हान असणार आहे. याची गंभीर दखल घेत रिझर्व्ह बँकेने नियमित ऑडिटदरम्यान बँका, एनबीएफसी (NBFC) आणि पेमेंट एग्रीगेटर्सकडील सुरक्षा यंत्रणेची तपासणी अधिक कडक केली आहे.
अलीकडेच भारतीय स्टेट बँकेने (SBI) एआय गव्हर्नन्स आणि रिस्क ॲनालिटिक्स यांसारख्या वरिष्ठ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत वार्षिक ९० लाख ते १.६ कोटी रुपयांपर्यंतचे आकर्षक पॅकेज देऊ केले आहे. एआय आणि सायबर सुरक्षा या दोन्ही क्षेत्रांचा अनुभव असलेल्या तज्ज्ञांची बाजारपेठेत कमतरता असल्याने अशा मनुष्यबळाला मोठी मागणी निर्माण झाली आहे.
सहकारी बँकांसाठी काय आहेत नियम?
रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांसाठी लागू केलेल्या सायबर सुरक्षेच्या एकत्रित निर्देशांनुसार, बँकांच्या डिजिटल व्यवहारांच्या व्याप्तीनुसार त्यांचे 'लेव्हल १ ते लेव्हल ४' असे वर्गीकरण केले आहे. ज्या सहकारी बँका मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग किंवा थेट यूपीआय (UPI) सेवा देतात, त्यांना स्वतंत्र CISO किंवा समकक्ष तज्ज्ञ अधिकारी नेमणे आवश्यक आहे. तसेच, मोठ्या सहकारी बँकांना २४x७ सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर (C-SOC) उभारणे बंधनकारक आहे.
लहान सहकारी बँकांना राज्य बँकेचा आधार
मोठ्या बँकांप्रमाणे कोट्यवधींचे पॅकेज देऊन तज्ज्ञ नेमणे लहान सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने लहान बँकांसाठी नियम काहीसे लवचिक ठेवले आहेत. याशिवाय, महाराष्ट्र शासनानेही राज्यातील सर्व सहकारी बँकांचे वर्षातून एकदा सायबर सुरक्षा ऑडिट करणे अनिवार्य केले आहे. या पार्श्वभूमीवर, लहान सहकारी बँका बाह्य तज्ज्ञांची (Consultants) मदत घेत आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (MSC Bank) राज्यातील इतर सहकारी बँकांना सायबर सुरक्षेचे कवच आणि तांत्रिक सेवा देण्यासाठी पुढाकार घेतल्याने सहकारी बँकिंग क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.