

Pune: केंद्र सरकारच्या केंद्रीय सहकार धोरण २०२५ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली असून, या समितीत सदस्य म्हणून ज्येष्ठ सहकार नेते ॲड. सुभाष मोहिते यांची निवड करण्यात आली आहे. मा. सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या या समितीमध्ये त्यांच्या समावेशामुळे सहकार क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे.
Pune People's Co-Op. Bank Ltd., Pune चे ज्येष्ठ संचालक व विद्यमान व्यवस्थापन समिती अध्यक्ष असलेले ॲड. मोहिते हे बँकेचे माजी अध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. त्याचबरोबर ते Pune District Urban Cooperative Banks Association चे माजी अध्यक्ष व विद्यमान मानद सचिव आहेत. तसेच Pune District Cooperative Board चे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
रामराज्य सहकारी बँकेचे संस्थापक म्हणून त्यांनी नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात भक्कम पायाभूत काम उभारले. गेली ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी सहकार चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
सुमारे ३६ वर्षे सहकार व कामगार न्यायालयात वकील म्हणून कार्यरत राहिल्यामुळे ॲड. मोहिते यांना कायदेविषयक आणि प्रशासकीय बाबींचा सखोल अनुभव आहे. सहकारी संस्था कायदा, बँकिंग नियम, सभासदांचे हक्क आणि संस्थात्मक पारदर्शकता या विषयांवरील त्यांचे ज्ञान राज्याच्या सहकार धोरणाच्या आखणीमध्ये उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
या उच्चस्तरीय समितीत प्रथमच वकील व्यवसायातील प्रतिनिधीचा समावेश झाला असून, ही बाब सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाची मानली जात आहे. धोरणनिर्मिती प्रक्रियेत कायदेशीर दृष्टिकोनाची जोड मिळाल्याने धोरण अधिक व्यापक आणि परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय सहकार धोरण २०२५ शी सुसंगत राज्याचे धोरण तयार करण्यासाठी ही समिती काम करणार आहे. सहकारी बँका, पतसंस्था, साखर कारखाने, दुग्धसंस्था आणि इतर सहकारी संस्थांच्या शाश्वत विकासासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जाणार आहेत.
ॲड. सुभाष मोहिते यांच्या नियुक्तीमुळे सहकार व नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव आणि कायदेशीर जाण यांचा संगम या धोरणनिर्मितीत दिसून येईल, अशी अपेक्षा सहकार वर्तुळात व्यक्त होत आहे.