चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था,जि.रत्नागिरी.केवळ पतपुरवठा करणारी संस्था नसून, समाजजीवनाच्या केंद्रस्थानी उभी असलेली एक प्रेरणास्थळ ठरली आहे.सहकार सप्ताहाचे औचित्य साधून या संस्थेने आयोजित केलेले रक्तदान शिबिर हे सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरले. तब्बल १५० हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने आणि आत्मीयतेने या कार्यात सहभाग घेतला. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले.सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून बोलताना पालकमंत्री ना.उदय सामंत म्हणाले,दरवर्षी सहकार दिनाच्या निमित्ताने चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था रक्तदान शिबिर घेते हे खरोखरच आम्हा सगळ्यांना आदर्श देणारं काम आहे, म्हणून मी चव्हाण साहेब, प्रशांतजी, स्वप्नाताई आपल्या सर्वांच मनापासून कौतुक करतो आणि नुसतं कौतुक करत नाही तर या चांगल्या कार्यक्रमांमध्ये शासनाचे जर काही सहकार्य आपणास लागलं तर आम्ही नक्कीच आपल्या सोबत आहोत हा तुम्हाला शब्द देतो असे ना.सामंत म्हणाले.
या प्रेरणादायी कार्यक्रमाला चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे सन्माननीय चेअरमन, सहकार महर्षी श्री. सुभाषराव चव्हाण, प्रतिथयश उद्योजक व वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे चेअरमन श्री. प्रशांतजी यादव, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव, संचालिका सौ. स्मिताताई चव्हाण, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, डॉ.श्री. अभिजीत सावंत, डॉ.श्री. अमरसिंह पाटणकर,चिपळूण नागरी पतसंस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ व विविध क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते.इंडियन रेडक्रॉस सोसायटी, रत्नागिरी आणि श्री स्वामी समर्थ ब्लड बँक, डेरवण यांच्या सहकार्याने संपूर्ण उपक्रम प्रभावीपणे पार पडला. संस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्शन कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली.चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था ही आज ५० हून अधिक शाखा आणि दीड लाखांहून अधिक सभासदांची शृंखला लाभलेली एक अग्रगण्य संस्था आहे.