दक्षिण भारतातील बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बहु-राज्यीय पतसंस्थांपैकी एक असलेल्या श्री बिरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, एकसंबा ही संस्था आता पूर्णपणे सहकारी बँकेत रूपांतर करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. ग्रामीण आर्थिक समावेशनासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या संस्थेने नव्याने तंत्रज्ञानाधिष्ठित सेवा देण्याच्या तयारीसह आपली सहकारी मूल्ये जपण्याचा निर्धार केला आहे. ही माहिती संस्थेचे मुख्य प्रवर्तक व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी एका खास संवादात दिली. त्यांनी सांगितले की, संस्था आता पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण व शेतीप्रधान भागांमध्ये सेवा विस्तार करण्यासाठी कटिबद्ध आहे
ते पुढे म्हणाले, केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. मात्र, सरकारने पतसंस्थांकडे अधिक लक्ष द्यावे. ज्या ठिकाणी बँका पोहोचत नाहीत, तिथे हे सहकारी संस्थाच लोकांना सेवा देत आहेत.जोल्ले यांनी सध्या पतसंस्थांसमोरील काही अडचणींबाबतही भाष्य केले. CIBIL सारख्या क्रेडिट स्कोअरिंग प्रणालीचा अभाव, आणि चेकबुक इश्यू करण्यास परवानगी नसणे या दोन प्रमुख अडचणी असल्याचे ते म्हणाले. या अडथळ्यांवर तातडीने उपाययोजना झाल्यास पतसंस्थांसाठी बँकिंग क्षेत्राशी स्पर्धा करणे सुलभ होईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
श्री बिरेश्वर को-ऑपरेटिव्हने अद्याप आपला सहकारी आत्मा जपतानाच पूर्ण बँक होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. आम्ही आमची संस्था सहकारी बँकेत रूपांतरित करण्याचा प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.सध्या तो प्राथमिक तपासणीच्या टप्प्यात आहे,असे त्यांनी सांगितले.