वराछा को-ऑपरेटिव्ह बँकेत जागतिक सहकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.  वराछा को-ऑपरेटिव्ह बँक
Co-op Banks

वराछा बँकेत जागतिक सहकार दिनानिमित्त सायबर सुरक्षा प्रशिक्षणाचा उत्साह

सायबर सुरक्षा प्रशिक्षणात ३०० कर्मचाऱ्यांचा सहभाग

Pratap Patil

गुजरातमधील अग्रगण्य सहकारी संस्था वराछा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने जागतिक सहकार दिनानिमित्त सायबर सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाला बँकिंग क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चर बँकिंग (सीएबी), भारतीय रिझर्व्ह बँक आणि साउथ गुजरात को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन लिमिटेड (SCOBA) यांच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षणात नागरी सहकारी बँकांचे सुमारे ३०० अधिकारी व कर्मचारी यांनी डिजिटल युगातील वाढत्या सायबर धोक्यांपासून बचाव करण्यासाठी जागरूक आणि सक्षम बनण्यासाठी मार्गदर्शन घेतले. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञ तसेच सीएबीचे महाव्यवस्थापक आणि उपप्राचार्य आनंद उपाध्याय आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक सौगत चक्रवर्ती हे प्रमुख अतिथी आणि वक्ते म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वराछा बँकेचे अध्यक्ष श्री. भवानभाई नवापरा यांनी भूषवले, तर व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष आणि नॅफकबचे संचालक श्री. कानजीभाई भालाला तसेच महाव्यवस्थापक श्री. विट्ठलभाई धानानी यांनी सर्व मान्यवर अतिथी आणि सहभागींचे स्वागत केले. अतिथी वक्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आणि बँकेच्या संचालक मंडळ तसेच SCOBA पदाधिकाऱ्यांनी त्यांना स्मृतिचिन्हे व पुस्तके भेट दिली. वक्ते आनंद उपाध्याय आणि सौगत चक्रवर्ती यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सायबर सुरक्षेची आधुनिक तत्त्वे, डेटा सुरक्षा, बँकिंग फसवणूक ओळखण्याचे उपाय, फिशिंग हल्ल्यांपासून संरक्षण आणि डिजिटल दक्षता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

अध्यक्ष नवापरा यांनी आपल्या भाषणात म्हटले की, "फक्त तांत्रिक साधनसंपत्तीच्या आधारे सायबर हल्ल्यांना तोंड देता येणार नाही, कर्मचाऱ्यांनीही या धोक्यांची जाणीव ठेवून सतर्क राहणे आवश्यक आहे." तर अध्यक्ष कानजीभाई भालाला यांनी सांगितले की ,"डिजिटल युगात सायबर सुरक्षा ही आता एक गरज बनली आहे. बँक कर्मचाऱ्यांनी सतत अपडेट राहणे आणि योग्य प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे."

कार्यक्रमाचा समारोप वराछा बँकेचे महाव्यवस्थापक श्री. विट्ठलभाई धानानी यांच्या आभारप्रद भाषणाने झाला. त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानताना या प्रशिक्षण कार्यक्रमाला बँकिंग क्षेत्रात सुरक्षा जागरूकतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून मान्यता दिली जात आहे, असे सांगून अशा प्रकारच्या उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची गरज व्यक्त केली.

SCROLL FOR NEXT