मुंबई : वाढत्या सायबर धोक्यांपासून संरक्षण प्रदान करण्यासाठी सहकारी बँकिंग क्षेत्रात डिजिटल लवचिकता वाढवण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने देशातील पहिले सायबर सुरक्षा सुविधा केंद्र नवी मुंबईतील वाशी येथे ₹५० कोटी खर्चून उभारले आहे. सहकारी बँका आणि त्यांच्या ग्राहकांना सायबर फसवणुकीपासून संरक्षण देण्याच्या तीव्र गरजेतून हे सायबर सुरक्षा सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.
"अलीकडच्या वर्षांत सहकारी बँकांवर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले झाले आहेत, ज्यामुळे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले आहे. फक्त एका विशिष्ट फसवणुकीमुळे सुमारे ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे," असे ते म्हणाले.
बहुतेक सहकारी आणि ग्रामीण बँका मजबूत सायबर संरक्षण पायाभूत सुविधा तयार करण्यास असमर्थ आहेत. "त्यांच्याकडे तांत्रिक मनुष्यबळ नाही आणि निधीही नाही. म्हणूनच आम्ही या क्षेत्रासाठी एक सामायिक सायबर सुरक्षा यंत्रणा विकसित केली असून सायबर हल्ल्यापासूनच्या बचावाच्या सर्व सेवा या सदस्य बँकांना मोफत दिल्या जातील. हा खऱ्या अर्थाने एक सहकारी उपक्रम आहे. बारा महिने चोवीस तास देखरेख आणि संरक्षण देण्यासाठी आम्ही कोणतेही शुल्क आकारणार नाही," असे अनास्कर यांनी सांगितले.
नुकत्याच उद्घाटन झालेल्या सायबर सुरक्षा सुविधा केंद्राची रचना महाराष्ट्रातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सेवा देण्यासाठी करण्यात आली आहे. एआय-चालित प्लॅटफॉर्मद्वारे सक्षमीत ही प्रणाली ज्ञात आणि उदयोन्मुख सायबर धोके योग्य वेळीच शोधण्यास आणि सहभागी बँकांना तात्काळ सूचना देण्यास सक्षम आहे.
अनास्कर पुढे म्हणाले की, "केंद्राने अलीकडेच सिंधुदुर्गमधील एका सहकारी बँकेत झालेल्या मोठ्या सायबर उल्लंघनाला रोखण्यास मदत केली. आम्ही बँकेला आधीच इशारा दिला होता आणि निधी वेळेवर सुरक्षित करण्यात आला, या सुविधेवर सध्या ३५ प्रशिक्षित सायबर-सुरक्षा व्यावसायिक काम करतात, जे २४ तास कार्यरत राहण्यासाठी शिफ्टमध्ये काम करतात."
ऑनलाइन धोक्यांविरुद्ध जागरूकता आणि तयारी सुधारण्यासाठी सदस्य बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सायबर स्वच्छता प्रशिक्षण देण्याची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक योजना आखत आहे. अनास्कर म्हणाले, "हा उपक्रम संपूर्ण सहकारी क्षेत्राच्या सुरक्षिततेसाठी टाकलेले एक भविष्यकालीन पाऊल आहे आणि इतर राज्यांसाठी नक्कीच एक आदर्श म्हणून काम करेल, अशी अपेक्षा आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवरील वाढते अवलंबित्व आणि एआयच्या वाढीमुळे, अशा पायाभूत सुविधा आता पर्यायी राहिलेल्या नाहीत. ती एक गरज आहे", असेही श्री. अनास्कर यांनी नमूद केले.