डीएनएस बँक ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा  डीएनएस बँक
Co-op Banks

डोंबिवली नागरी बँकेचा १०% लाभांश. ४३.६४ कोटी नफा

५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत इंदूर, उज्जैन आणि सोलापूर शाखा विस्ताराची घोषणा केली.

Banco India

डोंबिवली नागरी सहकारी बँकेची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भव्य आणि यशस्वीरीत्या संपन्न झाली. या सभेस बँकेचे सर्व माननीय संचालक, माजी संचालक,  वरीष्ठ अधिकारी वर्ग, शाखा व्यवस्थापक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. बँकेचे माननीय अध्यक्ष ॲड. श्री गणेश धारगळकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

सभेमध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ या कालावधीतील बँकेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. हे आर्थिक वर्ष बँकेच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आणि प्रगतीकारक ठरले आहे.आर्थिक वर्षातील महत्वाच्या उपलब्धिंबाबत माहिती देताना बँकेचे अध्यक्ष ॲड. धारगळकर यांनी थोडक्यात प्रगतीची माहिती दिली. “२०२४ – २५ या आर्थिक वर्षात, बँकेचा निव्वळ नफा रु. ४३.६४ कोटी एवढा झाला असून,  ठेवी व कर्जवाटपात लक्षणीय वाढ झालेली आहे. आर्थिक वर्षात बॅंकेकडील ठेवी ४०५२ कोटींवर पोहचल्या असून, कर्ज व्यवहार २३१३ कोटींवर स्थिरावला आहे. बँकेच्या एकूण व्यवसायात मागील वर्षापेक्षा २१९ कोटींची भर पडून, २०२४ – २५ या आर्थिक वर्षा अखेरीस ६३६५ कोटी एवढा मिश्र व्यवसाय झाला आहे. यावर्षी कर्ज वाटप करताना लघु उद्योग आणि किरकोळ कर्जवाटपावर भर देण्याचे धोरण अवलंबिले. यावर्षी देखील बँकेच्या कर्ज वसुली आणि कर्ज देखरेख विभागाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. सर्व कायदेशीर मार्गांचा सुयोग्य वापर करीत वरील दोन्ही विभागांनी कर्ज वसुली केल्यामुळे, आर्थिक वर्ष २०२५ अखेरीस ढोबळ अनुत्पादित कर्जाचे (ग्रॉस NPA) प्रमाण केवळ  १.१०% एवढे असून, नक्त अनुत्पादित कर्ज (नेट NPA) ०.००% राखण्यात बँकेला यश मिळाले आहे. या आर्थिक वर्षात बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) मागील वर्षाहून वाढून यावर्षी १६.८८% झाला. रिझर्व्ह बँकेच्या किमान १२% निकषापेक्षा तो कितीतरी अधिक आहे.

बँकेच्या सर्वसाधारण भागधारक सभासदांसाठी १०% आणि प्राधान्यक्रमाच्या भाग-धारकांना १०.२५% लाभांश प्रस्तावित करण्यात आला आणि सभेच्या मंजुरी नंतर लगेचच त्याचे वितरण करण्यात आले. चालू आर्थिक वर्षात मध्यप्रदेश राज्यातील इंदोर,  उज्जैन तसेच महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणी बॅंकेच्या शाखा उघडल्या जाणार आहेत.बँकेच्या वतीने, महत्वपूर्ण डिजिटल सुविधा देण्यात येत असून,  सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी 'सोसायटी रन' ॲप, तसेच शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांसाठी फी कलेक्शन ॲप या सुविधा फार महत्वाच्या ठरणार आहेत. डोंबिवली नागरी सहकारी बँक आगामी काळात कॉर्पोरेट लुक आणि को-ऑपरेटिव्ह सोल या तत्वावर वाटचाल करणार असून "ग्राहक-केन्द्रित सेवा", “डिजिटल प्रगती” आणि “सामाजिक बांधिलकी” यासाठी सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी मा.संचालकांतर्फे व्यक्त करण्यात आला.

SCROLL FOR NEXT