क्रेडिट कार्ड मर्यादा ओलांडल्यास काय घडते ते समजून घ्या. 
Financial Inclusion

क्रेडिट कार्डची मर्यादा ओलांडली तर काय होते? जाणून घ्या

पेमेंट नाकारले जाण्यापासून ते अतिरिक्त शुल्क आणि क्रेडिट स्कोअरवर परिणाम - क्रेडिट कार्ड मर्यादा ओलांडल्यास काय घडते ते समजून घ्या.

Prachi Tadakhe

क्रेडिट कार्डची मर्यादा ओलांडली तर काय होते?

आजकाल दैनंदिन व्यवहारांमध्ये क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऑनलाइन खरेदी, प्रवास तिकीट बुकिंग किंवा रेस्टॉरंट बिल भरणे अशा अनेक व्यवहारांसाठी लोक कार्ड वापरतात. मात्र अनेकदा असे होते की अचानक पेमेंट करताना व्यवहार अयशस्वी होतो आणि तेव्हा लक्षात येते की कार्डची मर्यादा पूर्ण झाली आहे.

क्रेडिट कार्ड मर्यादा म्हणजे बँक त्या कार्डवर तुम्हाला कर्ज स्वरूपात वापरता येणारी कमाल रक्कम. ही मर्यादा ओलांडली तर काही आर्थिक परिणाम होऊ शकतात.

1. व्यवहार नाकारला जाऊ शकतो

बहुतेक वेळा जर तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा पूर्ण झाली असेल तर पुढील व्यवहार बँकेची प्रणाली आपोआप नाकारते.

उदाहरणार्थ, तुमच्या कार्डची मर्यादा ₹1 लाख आहे आणि तुम्ही आधीच ₹97,000 खर्च केले आहेत. अशा वेळी तुम्ही ₹5,000 चा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला तर तो मंजूर होण्याची शक्यता कमी असते. कारण तो व्यवहार मंजूर झाल्यास एकूण थकबाकी मर्यादेपेक्षा जास्त होईल.

2. कधी कधी व्यवहार मंजूर होऊ शकतो

काही वेळा मर्यादेपेक्षा थोडा जास्त व्यवहार बँक मंजूर करू शकते. विशेषतः जर ती रक्कम लहान असेल किंवा आधीपासून ठरलेले स्वयंचलित पेमेंट असेल.

उदाहरणार्थ:

  • OTT किंवा ॲप सबस्क्रिप्शन

  • विमा प्रीमियम

  • वीज किंवा मोबाईल बिल

अशा परिस्थितीत तुमची थकबाकी तात्पुरती क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त होऊ शकते.

3. अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते

जर बँकेने मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करण्यास परवानगी दिली तर त्यासाठी ओव्हर-लिमिट शुल्क (Over-limit fee) आकारले जाऊ शकते.

हे शुल्क प्रत्येक बँक आणि कार्डनुसार वेगवेगळे असते. काही बँकांनी हे शुल्क कमी केले आहे किंवा बंद केले आहे, परंतु अनेक कार्डमध्ये अजूनही अशी तरतूद असते.

4. उपलब्ध क्रेडिट ऋणात जाऊ शकते

मर्यादा ओलांडल्यानंतर तुमचे उपलब्ध क्रेडिट ऋणात जाऊ शकते.

उदाहरणार्थ:

  • कार्ड मर्यादा : ₹1,00,000

  • थकबाकी : ₹1,04,000

अशा परिस्थितीत तुमचे उपलब्ध क्रेडिट -₹4,000 असेल. म्हणजेच तुम्ही किमान ₹4,000 भरल्याशिवाय नवीन व्यवहार करणे शक्य होणार नाही.

5. व्याज आणि शुल्कामुळे मर्यादा ओलांडली जाऊ शकते

काही वेळा ग्राहक नवीन खरेदी न करता देखील मर्यादा ओलांडली जाते. याचे कारण म्हणजे:

  • मागील बिलाची अपूर्ण भरपाई

  • व्याजाची रक्कम

  • विलंब शुल्क

  • शुल्कावर लागणारा GST

हे सर्व शुल्क स्टेटमेंटमध्ये जोडले गेल्यानंतर एकूण थकबाकी मर्यादेपेक्षा जास्त होऊ शकते.

6. क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो

क्रेडिट कार्ड मर्यादा वारंवार ओलांडल्यास त्याचा क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होऊ शकतो.

क्रेडिट ब्युरो तुमच्या क्रेडिट युटिलायझेशन रेशोवर लक्ष ठेवतात. म्हणजे तुम्ही उपलब्ध क्रेडिटपैकी किती टक्के वापरत आहात. जर तुम्ही सतत मर्यादेपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करत असाल तर कर्ज देणाऱ्या संस्थांना वाटू शकते की तुम्ही कर्जावर जास्त अवलंबून आहात.

यामुळे भविष्यात

  • कर्ज मिळणे कठीण होऊ शकते

  • व्याजदर जास्त लागू शकतात

मर्यादा ओलांडणे कसे टाळावे?

क्रेडिट कार्ड वापरताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास ही समस्या टाळता येते.

  • कार्ड मर्यादेच्या 60–70% पर्यंतच खर्च ठेवणे

  • महिन्याभरात नियमित शिल्लक तपासणे

  • बिल वेळेवर भरणे

  • स्वयंचलित पेमेंटची माहिती ठेवणे

उदाहरणार्थ, जर तुमची कार्ड मर्यादा ₹1 लाख असेल तर ₹60,000 ते ₹70,000 पर्यंत खर्च ठेवणे सुरक्षित मानले जाते.

एक-दोन वेळा चुकून क्रेडिट कार्डची मर्यादा ओलांडणे ही गंभीर बाब नसली तरी वारंवार असे होणे आर्थिक शिस्तीचे संकेत देत नाही. त्यामुळे कार्डचा वापर करताना मर्यादा लक्षात ठेवणे आणि वेळेवर बिल भरणे हे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठरते.

SCROLL FOR NEXT