एका प्रसिद्ध खाजगी बँकेच्या (रिलेशनशिप मॅनेजर) संबंध व्यवस्थापकपदावर काम करणाऱ्या महिलेने ४१ ग्राहकांचे त्यांच्या खात्यातून ४.५७ कोटी रुपये चोरले आहेत. त्यात अधिकतर खातेदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत.
राजस्थानमधील शाखेतील व्यवस्थापिकेने सन- २०२० ते २०२३ दरम्यान फसवणुकीचे हे प्रकार शांतपणे सुरु ठेवले होते.
तिने पुढीलप्रमाणे फसवणूक केली:
🔸 ग्राहकांना न कळवता त्यांच्या 110 मुदत ठेवी परस्पर मोडल्या व रक्कम घेतली. . (म्हणजे विड्रॉल केल्या).
🔸 काही खातेदारांच्या नावाने त्याच बँकेतून ठेवीवर कर्ज काढले आणि रक्कम घेतली
🔸 मूळ खातेदाराला हे कळू नये म्हणून त्यांनी सुरुवातीला बँकेला दिलेला मोबाईल नंबरही या महिलेने बदलून तिथं स्वतःचा नंबर टाकला जेणेकरून ओटीपी आणि अलर्ट मूळ मालकाला जाऊ नयेत.
🔸 हे चोरीचे पैसे साठवण्यासाठी तिने शाखेतीलच दुसऱ्या एका वृद्ध व्यक्तीच्या खात्याचा वापर केला. ज्या खात्यात फारशी उलाढाल होत नव्हती. आणि त्या खात्याचा मोबाईल नंबर पण तिने बदलून स्वतःचा टाकला.
🔸 तिने हे साडेचार कोटी रुपये टप्प्याटप्प्याने स्वतःकडे घेतले आणि नंतर टप्प्याटप्प्याने शेअर बाजारातील ट्रेडिंगमध्ये (एफ अँड ओ) सगळेच्या सगळे गुंतवले. मात्र, दुर्दैव तिचे की त्यामध्ये ती पूर्णपणे तोट्यामध्ये गेली आणि सगळे पैसे बुडाले. मात्र, तोवर तिने बँकेतून पोबारा केला होता.
यामध्ये वाईट काय आहे? तर यात लुटले गेलेले अधिकतर ग्राहक वृद्ध आहेत. 3 वर्षांनंतरही त्यांना फसवणुकीची जाणीव झाली नाही. हे लुटण्याचे सत्र सन २०२० ते २०२३ असे सुरु होते. या तीन वर्षात या पैकी एकाही खातेदाराने बँकेच्या संपर्कात राहून अपडेट घेतले नाहीत. अर्थात, जेव्हा ही घटना उघडकीस आली, तेव्हा बँकेने रीतसर पोलिसात तक्रार दाखल केली आणि कायदेशीर कारवाईदेखील सुरु केली आहे. तेव्हापासून पोलीस त्या महिलेला शोधत होते. आणि अखेर मे २०२५ मध्ये तिच्या बहिणीच्या लग्नात तिला पकडण्यात पोलिसांना यश आले.
आता पोलिसांकडून तिची चौकशी सुरु आहे; पण त्या मूळ खातेदार मंडळींचे पैसे त्यांना परत कधी मिळणार ? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. हा प्रश्न म्हणजे वृद्ध खातेदारांच्या शिरावर टांगती तलवार झाली आहे.
यातून आपण आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील धडे ध्यानात घेणे गरजेचे आहे.
एसएमएस अलर्ट किंवा चुकलेल्या ओटीपीकडे दुर्लक्ष करू नका.
बँकेशी लिंक केलेला तुमचा मोबाईल नंबर नेहमी पडताळून पहा. त्यासाठी अधून-मधून स्वतः बँकेत जाऊन यावे.
पालक/ वडीलधाऱ्यांना त्यांचे एफडी नियमितपणे तपासण्यास प्रोत्साहित करा.
बँकांनी देखील त्यांच्या अंतर्गत अशा प्रणालींवर अधिक काटेकोरपणे लक्ष ठेवले पाहिजे.
त्याच बरोबर बॅंकामधील कुठल्याही अंतर्गत GL & PL खात्याला manually वापर करण्याचा हक्क त्वरित बंद करायला हवेतच. व करायचे असतील तर कोणत्याही एका व्यक्तिला न ठेवता चेकर, मेकर आणि Authorisor ना असायलाच हवा.
मंडळी, हे केवळ एका घोटाळ्याचे वर्णन नाही, तर तुम्हाला जागरूक करण्यासाठी आणि सावध राहण्यासाठी दिलेला एक इशारा आहे! सावधान!!