'सीईओ' चा बनावट मेसेज आला आणि मॅनेजरने क्षणात पैसे ट्रान्सफर केले. 
Arth Warta

व्हॉट्सॲप हॅक... आणि ८० लाख गायब! कोल्हापुरात खळबळ!

उजळाईवाडीतील युनिटी मोटर्सच्या अकाऊंट मॅनेजरला केवळ एका डीपी (DP) ने कसं फसविलं? वाचा सविस्तर...

Prachi Tadakhe

उजळाईवाडी : डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर जितका वाढला आहे, तितकाच सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाटही वाढला आहे. विश्वासार्हतेचा फायदा घेऊन लाखोंचा गंडा घालण्याची एक धक्कादायक घटना कोल्हापूरजवळील उजळाईवाडी परिसरात उघडकीस आली आहे. गोकुळ शिरगाव येथील 'युनिटी मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या अकाऊंट मॅनेजरला चक्क कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या (CEO) नावाने बनावट व्हॉट्सॲप संदेश पाठवून ८० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

गोकुळ शिरगाव येथील युनिटी मोटर्स कंपनीत प्रशांत पाटील (वय ४५, रा. तुळजाभवानी नगर, उजळाईवाडी कोल्हापूर) हे अकाऊंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. २ जुलै रोजी एका अज्ञात सायबर भामट्याने ९७५४००४५६२ या मोबाईल क्रमांकाचा वापर केला. आरोपीने पाटील यांचे व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक केले किंवा त्यांच्याशी संपर्क साधला. मोबाईलमध्ये 'सीईओ गुरिंदर सर' या नावाने सेव्ह असलेल्या गुरिंदर सिंग यांच्या मोबाईल क्रमांकाचा डीपी (प्रोफाइल पिक्चर) आणि नाव वापरून हुबेहूब बनावट प्रोफाइल तयार करण्यात आली.

स्वतः कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बोलत असल्याचा बनाव रचून, सायबर भामट्याने अकाऊंट मॅनेजर प्रशांत पाटील यांना व्हॉट्सॲपवर तातडीने पैसे पाठविण्याच्या सूचना दिल्या.

कंपनीच्या वरिष्ठांकडून थेट आदेश आल्याचे समजून आणि डीपी तसेच नावावर विश्वास ठेवून प्रशांत पाटील यांनी तात्काळ कार्यवाही केली. सायबर भामट्याने दिलेल्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यांवर आरटीजीएस (RTGS) द्वारे एकूण ८० लाख ५० हजार रुपये वर्ग करण्यात आले. काही वेळानंतर ही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीत एकच खळबळण उडाली.

याप्रकरणी प्रशांत पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध अधिकृत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, ज्या बँक खात्यांवर पैसे वर्ग झाले आहेत त्याचा तपशील आणि वापरलेल्या मोबाईल क्रमांकाचा माग काढण्याचे काम सायबर सेलच्या मदतीने सुरू केले आहे.

कॉर्पोरेट क्षेत्रात 'सीईओ' किंवा उच्च अधिकाऱ्यांच्या नावाने खोटे मेसेज किंवा ईमेल पाठवून पैसे उकळण्याचे प्रमाण (Whaling/CEO Fraud) मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे:

  • पडताळणी करा: ऑफिसमधील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने व्हॉट्सॲप किंवा ईमेलवर तातडीने मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितल्यास, आधी त्यांना थेट फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून खात्री करा.

  • घाईगडबडीत निर्णय नको: सायबर गुन्हेगार नेहमी 'तातडीचे काम आहे' असे भासवून विचार करायला वेळ देत नाहीत. अशा वेळी शांत राहून पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

  • सायबर हेल्पलाईन: अशी कोणतीही फसवणूक झाल्यास त्वरित '1930' या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.

SCROLL FOR NEXT