WhatsApp Diwali Scam: मोफत बोनसच्या नादात होईल कंगाल! 
Arth Warta

दिवाळी गिफ्टच्या नावाखाली WhatsApp वर कोटींची फसवणूक?

२ हजारांच्या 'फेस्टिव्ह गिफ्ट'च्या आमिषाने होतेय फसवणूक; असा करा बचाव.

Prachi Tadakhe

सध्या देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असून, यादरम्यान नागरिक एकमेकांना भेटवस्तू आणि शुभेच्छा पाठवत आहेत. याच सणासुदीच्या वातावरणाचा फायदा आता सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminals) घेतला आहे. लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp वर सध्या एक नवीन आणि अत्यंत धोकादायक स्कॅम वेगाने व्हायरल होत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर युजर्सना फसवण्यासाठी 'फ्री गिफ्ट' किंवा 'बोनस'चे आमिष दाखवले जात असून, या एका चुकीच्या क्लिकमुळे तुमचे संपूर्ण बँक खातं रिकामं होऊ शकतं.

कसा चाललाय हा स्कॅम?

व्हाट्सएपवर सध्या वेगाने पसरणाऱ्या या मेसेजमध्ये युजर्सना "२ हजार रुपयांचा दिवाळी बोनस" किंवा आकर्षक फेस्टिव्ह गिफ्ट्स देण्याचे खोटे आमिष दाखवले जात आहे. या मेसेजची विश्वासार्हता वाढवण्यासाठी आणि लोकांचा संशय दूर करण्यासाठी त्यात "मला वाटलं फेक आहे, पण खरंच २००० रुपये मिळाले, तुम्हीही एकदा ट्राय करा!" अशाप्रकारचे भुरळ पाडणारे वाक्य वापरले गेले आहे.

धोकादायक बाब म्हणजे, हे मेसेज अनेकदा युजर्सना त्यांच्याच एखाद्या ओळखीच्या मित्राकडून, नातेवाईकाकडून किंवा ग्रुपमधून फॉरवर्ड झालेले येतात. त्यामुळे समोरची व्यक्ती नकळत या जाळ्यात अडकते.

क्लिक केल्यास काय होईल नुकसान?

सायबर तज्ज्ञांच्या मते, हा एक सुनियोजित फिशिंग अटॅक (Phishing Attack) आहे. या मेसेजमध्ये दिलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक केल्यास खालील धोके उद्भवू शकतात:

  1. खाजगी डेटाची चोरी: तुमच्या फोनमधील अतिशय संवेदनशील आणि वैयक्तिक माहिती (Personal Data) सुरक्षिततेच्या बाहेर जाऊन हॅकर्सच्या हातात जाऊ शकते.

  2. बँक अकाउंट हॅक: स्कॅमर्स केवळ व्हॉट्सॲप अकाउंटच नव्हे, तर तुमच्या मोबाईलमधील बँकिंग ॲप्सवर ताबा मिळवून बँक खातं पूर्णपणे रिकामं करू शकतात.

  3. आर्थिक फसवणूक: तुमच्या नकळत तुमच्या खात्यावरून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केले जाऊ शकतात.

  4. बनावट जाहिरातींतून कमाई: काही स्कॅमर्स या बनावट वेबसाईटवर युजर्सना अडकवून जाहिरातींच्या माध्यमातून स्वतःची कमाई करतात आणि युजर्सचे नुकसान करतात.

या स्कॅमपासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवाल?

डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांच्या क्लृप्त्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खालील महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे:

  • संशयास्पद लिंक्स टाळा: मेसेज किंवा सोशल मीडियावर पाठवलेली कोणतीही अज्ञात किंवा संशयास्पद लिंक उघडू नका, मग ती लिंक पाठवणारी व्यक्ती तुमचा कितीही जवळचा मित्र किंवा नातेवाईक का असेना.

  • मेसेज तात्काळ डिलीट करा: असा मेसेज दिसल्यास तो क्षणाचाही विलंब न लावता डिलीट करा आणि संबंधित नंबर ब्लॉक करा.

  • आधारे पुढे पाठवू नका: कोणतीही खात्री न करता असे मेसेज कधीही इतर ग्रुप्सवर किंवा मित्रांना फॉरवर्ड करू नका. उलट, ज्या व्यक्तीने तुम्हाला तो मेसेज पाठवला आहे, त्यांना फोन करून किंवा मेसेज करून तो बनावट असल्याचे सांगा आणि त्यांनाही सतर्क करा.

  • 'टू-स्टेप व्हेरिफिकेशन' वापरा: तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटची सुरक्षा वाढवण्यासाठी नेहमी 'Two-Step Verification' सुरू ठेवा.

  • अतिलोभापासून दूर राहा: "कोणतेही कष्ट न करता मोफत पैसे किंवा महागड्या वस्तू मिळणे" यांसारख्या ऑफर्स नेहमीच खोट्या आणि फसव्या असतात, हे लक्षात ठेवा.

महत्त्वाची टीप: कोणतीही खात्रीशीर ऑफर किंवा स्किम असेल, तर ती संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासा. सणासुदीच्या काळात सतर्क राहा आणि सुरक्षित राहा!

SCROLL FOR NEXT